राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर एस.टी कामगारांनी केलेल्या हल्ल्यांनंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात राष्ट्रवादीचे आंदोलन झाले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हा राज्याचा प्रश्न होता तुम्हाला मोर्चा आणि हल्लाच करायचा होता, तर ‘मातोश्री’वर करायला हवा होता. मग हल्ल्याची किंमत काय मोजावी लागली असती ते तुम्हाला कळले असते, असे विधान आमदार दिलीप मोहिते यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरला आहे.
8 एप्रिल रोजी दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमावाने आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पलफेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. राज्यातील मंत्रिमंडळात कुठलाही निर्णय झाला, तर मुख्यमंत्री त्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. एसटी कामगारांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काहीही निर्णय घेतला असता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाच आक्षेप नसता. तरी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला संपविण्याचे काम काही पक्ष करत आहेत. खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे पुणे – नाशिक महामार्गावरून राजगुरूनगर पोलीस ठाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोहिते बोलत होते.