महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. मागच्या वर्षी जून मध्ये एकनाथ शिंदे गट बंडखोरी करून शिवसेनेतून बाहेर पडला. या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोच अजित पवारांनीही बंडखोरी करत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधी नंतर पुन्हा एकदा दुपारचा शपथविधी चर्चेत आला आहे. अजित पवार यांनी आता चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. घटनेत या पदाची व्याख्या काय आहे पाहुयात…
देशात 1-2 नव्हे 18 उपमुख्यमंत्री आहेत. अनेक राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशात सर्वाधिक उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या खाली 5 उपमुख्यमंत्री केले आहेत. घटनेत उपमुख्यमंत्री पदाला मान्यता नाही. राज्यघटना 1950 मध्ये स्वीकारली गेली तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे उपपंतप्रधान होते. तेव्हा देशात उपमुख्यमंत्री नसला तरी राज्यघटनेने उपपंतप्रधान किंवा उप मुख्यमंत्री पदाला मान्यता दिलेली नाही. ही पद घटनेत नाहीत. जर आपण घटनेबद्दल बोललो तर हे पद कॅबिनेट दर्जाच्या वरिष्ठ मंत्र्ययाच्या बरोबरीचे आहे. संविधानात या पदांची कोणतीही तरतूद नाही. पण घटनेच्या मान्यतेनंतर अनेक उपपंतप्रधान आणि उपमुख्यमंत्रीही झाले. हे पद प्रतिकात्मकदृष्ट्या महत्वाचे दिसत असले तरी घटनात्मदृष्ट्या ते मंत्रीपद नाही.त्यांचा पगार आणि भत्तेही बरोबरीचे आहे. ही पोस्ट राजकीय उंची दर्शवते.
व्यवहारात कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा नक्कीच वरचे मानले जाते. पण उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या विभागांव्यतिरीक्त इतर कोणत्याही विभागात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. किंवा त्यांना बोलवून बैठकांचे नियोजन करता येत नाही. राजकीय पक्ष अनेक वेळा आपल्या मित्रपक्षांना खुश ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री पद देतात. एखाद्या विशिष्ट वर्गाच्या लोकांना खुश ठेवण्यासाठी किंवा मतांच्या राजकारणासाठी उपमुख्यमंत्री पद दिलं जातं. आपली युती अबाधित ठेवण्यासाठी अनेकदा उपमुख्यमंत्री पद दिलं जातं.
शिंदे – फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल. मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री होणारे फडणवीस हे पहिले नेते आहेत. देशात गेल्या काही वर्षांत राज्यांमध्ये अतिशय वेगाने उपमुख्यमंत्री करण्यात येत आहेत. कोणत्या राज्यात किती उपमुख्यमंत्री आहेत पाहुयात….
आंध्रप्रदेश – 5
अरुणाचल – 1
बिहार – 2
दिल्ली – 1
हरियाणा – 1
महाराष्ट्र – 2
मेघालय – 1
मिझोराम – 1
नागालँड – 1
त्रिपुरा – 1
उत्तर प्रदेश – 2
महाराष्ट्रात आत्तापर्यंत सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पदी राहिलेली व्यक्ती म्हणजे अजित पवार..पण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजवर ‘उपमुख्यमंत्री’ पदावर राहिलेल्या व्यक्तिला ‘मुख्यमंत्री’ पदावर जाता आलेलं नाहीये. आणि अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीही लपलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात काय वळण येणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.