महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी कॉंग्रेसने सत्तेचा आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्यात निदर्शने करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला.
मुळीक म्हणाले, देशात महाराष्ट्र कॉंग्रेसमुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधान शंभर टक्के सत्य आहे.
त्यामुळे कोरोना देशभर वेगाने फैलावला. हे सत्य पचविण्याची ताकद कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात नाही. त्यामुळेच अस्तित्व टिकविण्यासाठी नैराश्याच्या भावनेतून कॉंग्रेस टीका करीत आहे.
मुळीक पुढे म्हणाले, भाजपने पुण्यासाठी काय केले हा प्रश्न विचारण्याचे धाडस कॉंग्रेसचे नेते करतात याचे आश्चर्य वाटते. खरे तर कॉंग्रेसने पन्नास वर्षांत काय केले हा खरा प्रश्न आहे. पुणे मेट्रो काँग्रेसच्या काळात कागदावरच राहिली. राज्यात आणि केंद्रात भाजपचे शासन आल्यानंतर मेट्रोला गती मिळाली आणि केवळ पाच वर्षात पुण्यात मेट्रो धावू लागली.
भाजपचे पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही नक्की सत्तेत येऊ असा विश्वास वाटतो. मोदी यांचा दौरा पूर्णपणे शासकीय आहे.
त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने करू नये. अन्यथा २००७ च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ३ डिसेंबर २००६ रोजी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग बीआरटीच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांचा हा दौरा राजकीय होता का असा प्रश्न विचारा लागेल.
प्रशांत जगताप यांना गांभीर्याने घेत नाही
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या घोषणांना किंमत देत नसून, त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांची बाहेर एक आणि महापालिकेत दुसरे अशी भूमिका असते. त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक त्यांचेच आदेश पाळत नाहीत. हे वारंवार सिद्ध झाले आहे. शहरातील सिग्नल यंत्रणांचे सुसूत्रीकरण, महापालिकेचे कोरोना काळातील कॉफी टेबल बुक, शहरात उभी राहत असणारी रुग्णालये यांच्या बाबतीत त्यांनी आंदोलने केली.
परंतु त्यांच्या महापालिकेतील सर्वच सभासदांनी या ठरावांना एकमुखी पाठींबा देत जगताप यांना तोंडघशी पाडले. महापालिकेत एकशे बावीस नगरसेवक निवडून येतील या जगताप यांच्या विधानाची उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी खिल्ली उडविली. आता मोदींच्या विरोधात निदर्शने करण्याची जगताप यांची भाषा अशीच वल्गना करणारी आहे.
कारण अजितदादा पवार यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे विधान करून जगताप यांना पुन्हा उघड्यावर पाडले आहे. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही.