पिंपरी – प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून आज गुरुवारी (दि. 2) डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. लक्ष्मण जगताप यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये, असे आवाहन माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी केले आहे.
आमदार जगताप यांच्यावर बाणेर येथील खासगी रुग्णालयात दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी जगताप यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना, होमहवन केले होते. कार्यकर्त्यांचे हे प्रेम आणि प्रार्थना फळाला आली आणि त्यांच्या प्रकृतीत एक महिन्यानंतर स्थिर झाली. आता त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
आमदार जगताप यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची बातमी समजल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ते रुग्णालयातून घरी येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले.
याबाबत बोलताना माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले, “या कठीण काळात शहरातील जनता, कार्यकर्ते व हितचिंतकांनी दिलेले प्रेम संपूर्ण जगताप कुटुंबीय कधीच विसरू शकणार नाही. डॉक्टरांनी भाऊंना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी निवासस्थानी गर्दी करू नये”