कोलकात्यातील आरजी कर बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी संजय रॉय याला सियालदह कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अत्यंत क्रूरपणे रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. सीबीआयने या प्रकरणाला रेयर ऑफ द रेयरेस्ट सांगून फाशीची मागणी केली होती. सर्व पुरावे न्यायालयात सादर करून आरोपीला कठोर शिक्षा देऊन इतरांसाठी हा एक धडा होईल असं मत मांडलं होतं. मात्र न्यायमूर्ती अनिर्बान दास यांनी सीबीआयच्या युक्तिवादाला नाकारून केवळ जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संजय रॉयला जन्मठेपच का दिली गेली? संजय रॉय फाशीपासून नेमका कसा बचावला. पाहूया याबाबत चा रिपोर्ट.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथल्या आरजीकर रुग्णालयात शिकावू महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवलेल्या संजय रॉयला फाशीची शिक्षा अपेक्षित असताना केवळ जन्मठेप मिळाली. 9 ऑगस्ट 2024 ला ही घटना घडली होती. या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली. डॉक्टरांनी अनेक महिने आंदोलन केली होती. हे प्रकरण घडल्यानंतर सहा महिन्यांनी आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. पण संजय रॉयला केवळ जन्मठेप इतकीच शिक्षा ही अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. या प्रकरणात न्यायालयाचं म्हणणं असं आहे की हे प्रकरण रेयर ऑफ द रेयरेस्ट केस मध्ये येत नाही. जजने निकाल देताना म्हटलं की हे प्रकरण दुर्मिळातील दुर्लभ श्रेणीत येत नाही. त्यामुळे फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. जजने पीडित कुटुंबाला उच्च न्यायालयात अपील करण्याचा पर्याय खुला असल्याचं सांगितलं. संजय रॉयच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालांचा हवाला दिला. आरोपीला सुधारण्यासाठी संधी दिली जावी. जर पुराव्यांवर काही शंका असेल किंवा निर्णय विचारांच्या आधारे घेतला जात असेल तर आरोपीला फाशीऐवजी वेगळी शिक्षा दिली पाहिजे. संजय रॉयच्या वकिलांनी दिल्लीतील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या संशोधनाचा हवाला दिला. ज्यामध्ये मृत्युदंडाला विरोध दर्शवण्यात आला आहे. आरोपीच्या मानसिक स्थिती कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला जावा असं वकिलांनी सांगितलं. न्यायालयात सीबीआयने आरोपीविरोधात जे पुरावे सादर केले त्यात आरोपी संजय रॉयचा मोबाईल घटनास्थळी उपस्थित होता, हे लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजमधून सिद्ध झाले. पीडितेच्या शरीरावरून घेतलेल्या डीएनए नमुन्यांशी आरोपीचा डीएनए जुळला. आरोपीच्या जीन्स आणि बूटांवर पीडितेचे रक्त सापडले. फॉरेन्सिक अहवाल आणि 3D मॅपिंगमधून त्याठिकाणी आरोपीशिवाय कोणीही नव्हते हे स्पष्ट झाले. 9 ऑगस्ट ला नेमकं काय घडलं होतं त्यावरही एक नजर टाकूया. कोलकाता शहरातील आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये सकाळच्या सुमारास एका महिला ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्या जेवणानंतर ही महिला डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपली होती. तिथंच आरोपीने बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी टास्क फोर्सची स्थापना करून तपास सुरू केला आणि सहा तासांच्या आत घटनेतील आरोपी संजय रॉयला अटक केली. न्यायमूर्तींनी सुप्रीम कोर्टाच्या या प्रकरणासंदर्भातील निकालांचा अभ्यास केला आणि आरोपीला सुधारण्याची संधी दिली पाहिजे असा विचार मांडला. त्यामुळे संजय रॉयला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली.