जळगाव : जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचा पहिला दिवस एका विद्यार्थ्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला आहे. यामध्ये चक्कर येऊन पडल्याने एका विद्यार्थ्याला आपला जीव (Death) गमवावा लागला आहे. भुसावळ येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये काल सोमवारी सकाळी 8 वाजता ही हृदयद्रावक घटना घडली आहे. सुयोग भूषण बडगुजर (वय 13) (Suyog Bhushan Badgujar) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उन्हाळ्याची सुट्टी संपल्यामुळे सोमवारी जळगाव जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. आठवीच्या वर्गाचा पहिला दिवस असल्याने सुयोग हा सकाळी शाळेत गेला. शाळेची प्रार्थना सुरू असताना अचानक सुयोगला चक्कर (Dizziness) आली आणि तो जमिनीवर कोसळला. यानंतर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ खासगी दवाखान्यात केले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वडिलांचे आठ महिन्यापूर्वी झाले होते निधन
धक्कादायक बाब म्हणजे सुयोगच्या वडिलांचे आठ महिन्यापूर्वीच निधन झालं आहे. त्याच्या पश्चात आजी, आई आणि बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे बडगुजर परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुयोगला दोन ते तीन महिन्यांपूर्वी “ईडिओपॅथिक पलमोंनरी अर्टरी हायपरटेन्शन” हा आजार असल्याचे निदान झाले होते. सुयोगच्या वडिलांचे आठ महिन्यापूर्वी याच आजाराने निधन झाले होते. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.