स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. एप्रिलमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची या पक्षातून त्या पक्षात इनकमिंग आणि आउटगोइंग सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसाठी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. भाजपला मुंबईवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे. मुंबई महानगरपालिकेवर सर्वाधिक काळ शिवसेनेची सत्ता राहिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकीत ही धक्का देण्यासाठी भाजपने आपल्या मित्र पक्षांना हाताशी धरून तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इनकमिंग सुरु असल्याचं दिसतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नव्या जोमाने लढण्याची तयारी करीत असताना पक्षाला मोठा झटका बसला आहे. मुंबईतील शिवसेनेच्या रणरागिणी, उपनेत्या राजुल पटेल यांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.राजुल पटेल या मुंबईतील वर्सोवा विधानसभेसाठी इच्छुक होत्या. मात्र शिवसेना ठाकरे पक्षाने हारुन खान यांना उमेदवारी दिली आणि खान यांनी विजयही मिळवला. तेव्हापासूनच पटेल या पक्षात नाराज होत्या. तीन वेळच्या नगरसेवक तसेच महापालिकेच्या विविध समित्यांवरही त्यांनी काम पाहिले होते. राजूल पटेल या शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या होत्या. मुंबई महानगर पालिकेतील तीन वेळा नगरसेवक राहिल्या आहेत. राजूल पटेल या विधानसभा संघटक देखील होत्या. पक्षातील सर्वांत जुन्या महिला नेत्या म्हणूनही त्यांची ओळख होती. वर्सोव्यात हारुन खान जिंकून आल्याने तेथे विधानसभा मतदारसंघात काम करण्यास शिवसेना पक्षाला संधी होती. परंतु विधानसभेला डावलल्याने राजुल पटेल यांनी नाराज होऊन पक्षबदलाचा निर्णय घेतला. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंना जय महाराष्ट्र करत त्या शिंदे सेनेत दाखल झाल्या आहेत.