आपला महाराष्ट्र

वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे सोलापुरातही मोठं घबाड

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाताना दिसतोय. वाल्मीक कराड सध्या तपास यंत्रणेच्या कोठडीत आहे..त्याचा देशमुख हत्या प्रकरणातला सहभाग तपासला जात असताना कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातच पुण्यानंतर आता सोलापुरातही वाल्मीक कराडने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे मोठी संपत्ती जमवल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. वाल्मीकने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्ये देखील कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.. अंजली दमानिया यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती शेअर केली आहे. सोलापुरमध्ये ज्योती मंगल जाधव या महिलेच्या नावावर चार सातबारे असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही महिला कोण आहे? याचा ईडीने तपास करावा तसेच या जमिनी विकत घेण्यासाठी कुणी पैसे दिले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी पोस्टद्वारे केली आहे.

वाल्मीक कराडने मोठी माया जमवली असून यातील अनेक संपत्ती ही आपल्या पत्नी, मुलं आणि नातेवाईकांच्या नावावर जमा केल्याची माहिती समोर आली आहे. कराडने विदेशात देखील गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. वाल्मीक कराडने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. सुरुवातीला पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मीक कराडचा 4 बीएचके फ्लॅट असल्याची माहिती समोर आली त्यानंतर पुण्यातील हडपसर आणि खराडी भागातही वाल्मिकने आपली दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचं निदर्शनास आलं. पुण्यातील प्राइम लोकेशन समजल्या जाणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ४ ऑफिस गाळे, वाकडमध्ये एक फ्लॅट, मगरपट्टा सिटी परिसरात एका इमारतीचा संपूर्ण मजला, अमेनोरा पार्कमध्ये दोन आलिशान फ्लॅट आणि खराडी परिसरात एक फ्लॅट अशी कोट्यवधी रुपयांची संपत्ती वाल्मिकने आपल्या पत्नीच्या नावे विकत घेतल्याची माहिती आधीच समोर आली आहे.