राज्यात दिवसेंदिवस ऑनर किलिंगच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. काही महिन्यांपूर्वीच छत्रपती संभाजी नगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली होती. त्यानंतर आता जळगावमध्ये प्रेमविवाहतून जावयाची सैराट स्टाईल हत्या करण्यात आली आहे. सासरच्या मंडळींनी लव मॅरेजचा राग पाच वर्षांनी काढला. जळगावत घडलेलं हे ऑनर किलिंग प्रकरण नेमकं काय आहे पाहुयात. प्रेम विवाहाच्या रागातून सासरच्यांनी 26 वर्षांच्या जावयाची हत्या केली आहे. मुकेश शिरसाट असं मृत्यू झालेल्या जावयाचं नाव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागात ही घटना घडली. जावयाची हत्या करणारे पत्नीचे चुलत भाऊ, मामा आणि सासरच्या 7 नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील 3 संशयीत अद्यापही फरार आहेत. या हल्ल्यात मुकेश याच्या गर्भवती पत्नीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण सुदैवाने ती बचावली आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागात राहणाऱ्या मुकेश शिरसाटचं आपल्याच भागात राहणाऱ्या पूजासोबत प्रेम संबंध जुळले. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण पूजाच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन पूजाने मुकेशसोबत 4 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न केलं. मुकेश हातमजुरी करून आपला संसार चालवत होता. विरोध झुगारून लग्न केल्यामुळे पूजाच्या माहेरच्यांकडून वारंवार वाद निर्माण केले जात होते. अनेकदा हे वाद पोलिसांपर्यंतही पोहोचले. पण कौटुंबिक वाद असल्यामुळे पोलिसांनी कठोर भूमिका न घेता या प्रकरणात दोन्ही कुटुंबांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. प्रेम विवाहाचा राग पूजाच्या माहेरच्यांनी डोक्यात ठेवत अखेर मुकेशचा काटा काढला. 19 जानेवारी रोजी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला होता. त्यावेळी मुलीच्या माहेरीच्या मंडळींनी कोयता, चॉपरने मुकेशवर सपासप वार केले. या मारहाणीत मुकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
मुकेशला वाचवण्यासाठी पुढे आलेले त्याचे भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही सासरच्या मंडळींनी हल्ला केलाय. यात सात जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतल आहे. मुकेशची त्याच्याच घरासमोर सासरच्यांनी हत्या केल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. मुकेश आणि पूजा यांना 3 वर्षांची मुलगी आहे.. तसंच पूजा ही गर्भवतीही आहे. अशा परिस्थितीमध्ये मुकेशची हत्या झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुकेशच्या कुटुंबीयांनी केली आहे.