NEELAM GORHE: मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती
डॉ. नीलम गोऱ्हे (NEELAM GORHE) यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली. सदर महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेसाठी, नवा रिंगरोड प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय यंत्रणेनं
तत्काळ राबवावयाच्या पाच महत्त्वपूर्ण उपाययोजना घोषीत कराव्यात, अशा ठोस सूचना त्यांनी बैठकीत केल्या.
NEELAM GORHE FULL INTERVIEW | विधानपरिषदेच्या उपसभापती Dr. Neelam Gorhe | आधुनिक युगातली नवदुर्गा
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे विभागीय उपायुक्त तुषार ठोंबरे, पुणे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील,
विभागीय उपायुक्त तुषार ठोंबरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी संजय कदम, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांचे वरिष्ठ अभियंते,
वाहतूक पोलीस, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत नवले ब्रिज परिसरातील अपघातांच्या पुनरावृत्तीची कारणमीमांसा, वाहतूक कोंडी, ट्रक व
भारी वाहनांची अनियंत्रित गती, घाट आणि उतारातील वाहन नियंत्रण यावर सविस्तर चर्चा झाली.
अनेक अपघातांमध्ये वाहनांच्या वेगावरील अपुऱ्या नियंत्रणामुळे मोठी जीवितहानी झाल्याचे लक्षात घेऊन उपसभापतींनी पुढील उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आदेश दिले.
यामध्ये सर्वप्रथम, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत स्पीड कमी करण्यासाठी सुसंगत रबर स्पीड ब्रेकर किंवा
रंबल स्ट्रिप्स बसवण्यावर भर देता येईल. रस्ता ओला असताना वाहनांच्या घसरण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे हे स्ट्रिप्स संपूर्ण सुरक्षा मानकांनुसार बसवावेत, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली.
दुसरे म्हणजे, वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर तातडीने परिस्थिती हाताळण्यासाठी Action Oriented Plan (AOP) तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
रात्री वा पावसाळ्यात अपघात झाल्यास कोंडी वाढू न देता वाहन प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस, महामार्ग प्राधिकरण आणि मनपांच्या पथकांमध्ये समन्वय वाढवण्याची गरजही बैठकीत व्यक्त झाली.
तिसरे म्हणजे, अपघातप्रवण झोनमध्ये मोबाइल चेकपोस्ट किंवा स्थिर चौकीची स्थापना करता येईल का याबाबत नियमांनुसार तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेषतः भारी वाहनांचे वेग नियंत्रण, ब्रेक कंडीशन, ओव्हरलोडिंग यावर नजर ठेवण्यासाठी हे केंद्र प्रभावी ठरतील, असे उपसभापतींनी सांगितले.
चौथ्या उपाययोजनेत अपघातप्रवण परिसरात ध्वनीक्षेपक (Public Address System) बसवून चालकांना सतत वेग, उतार, पावसाळी परिस्थिती आणि ट्रॅफिक अद्यतनांची माहिती देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
हे सिस्टम महामार्ग पोलिसांच्या नियंत्रणात राहून त्वरित सूचना देऊ शकतील.
पाचव्या उपाययोजनेत जवळच फायर ब्रिगेडची सुविधा उपलब्ध ठेवणे, रेस्क्यू टीम तैनात करणे, तसेच अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये मदत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय ट्रक मालक असोसिएशनची बैठक घेऊन ड्रायव्हर ट्रेनिंग, उतारावरील गतीनियंत्रण, वाहनांची नियमित तपासणी अशा मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यासही सांगितले.
बैठकीदरम्यान उपसभापतींनी प्रशासनाला सांगितले की, नवले ब्रिज परिसरातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी जबाबदारी निश्चित करून एक आदर्श नमुना तयार करावा.
प्रशासनाने या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, येत्या 26 किंवा 27 डिसेंबर रोजी आपण या संदर्भात आढावा घेणार असल्याचे त्यापूर्वी याबाबीवरचा कार्य अहवाल ठेवावा असे निर्देश दिले.