पुणे- खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेल्या धडक मोर्चावेळी माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या आक्षेपार्ह विधानाची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या आक्षेपार्ह विधानाबाबत चंद्रकांत पाटील यांना लेखी खुलासा करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले होते.
या नोटीसीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले असून आपल्या उत्तरात चंद्रकांत पाटील म्हणतात गेली 46 वर्ष सामाजिक, राजकीय गेल्यानंतर स्वांसिद्धा, हेल्पर ऑफ द हॅन्डीकॅप, सावली,आई, संवेदना, व वात्सल्य यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी रात्रं-दिवस कार्यरत राहणाऱ्या जगातील सर्वात मोठया पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असणारा मी ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत 12 महिला आमदार व लोकसभेत 5 महिला खासदार आहेत. सुप्रियाताईंविषयी व महिलांविषयी मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यानं अपमानित व्हावं लागलं यासारखं दुःख नसून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण न मिळाल्यानं मी त्रागानं केलेल्या उद्गारात सुप्रिया सुळे व राज्यातील महिलांचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.