भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे (NARAYAN RANE)चिपळूण(CHIPALUN)मध्ये कृषी महोत्सवात भाषणाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना चक्कर आल्याने आणि आवाज बसल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले. या घटनेच्या एक दिवस आधीच राणेंनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना राणे म्हणाले होते की, आता थांबण्याचा विचार करायला हवा. दोन्ही मुले राजकारणात स्थिर झाली असून, उद्योगाची जबाबदारी सांभाळण्यासाठीही कोणी तरी हवं,असे सांगत त्यांनी राजकीय संन्यासाचा इशारा दिला.
सभेत बोलताना राणे यांनी आपल्या आयुष्याविषयीही भावना व्यक्त केल्या. “आजही नारायण राणे स्वतः रस्त्यावर भाजी घेतो. हातात अंगठ्या घालून, काळ्या काचांच्या गाड्यांत फिरणारे अनेकजण आहेत, पण माझ्या गाडीला काळ्या काचा नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
आपल्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना राणे (RANE)म्हणाले, “माझ्या वाटचालीत कुणाची मदत नव्हती. अनेकांनी अडथळे आणले. अनेक वर्षे एकाच पदावर राहू शकलो असतो, पण सतत कारस्थानं झाली. त्या वेळीही अडचणी आल्या, आजही आल्या. त्यामुळे आता पूर्णविराम द्यायचा ठरवलं आहे.”
दरम्यान, राणेंच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली जात असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत .