पुणे तिथे काय उणे; बिअर रिचवण्यात पुणेकरच पुढे ! (संपादकीय)

596 0

स्थळ : चहाची टपरी/वेळ : सायंकाळ

(दोन तरुण चहाचा घोट घेत वृत्तपत्र चाळतायत…)

सचिन : अरे, पशा ही बातमी वाचलीस का ?
प्रशांत : कोणती रे ?
सचिन : अरे, आपण बाजी मारली…
प्रशांत : च्यायला, कशात ? आपण काय दिवे लावले ?
सचिन : अरे, हे वाच; बिअर रिचवण्यात पुणेकर एक नंबर !
प्रशांत : च्यायला, खरंच की ! आपण करून दाखवलं ! नाद नाय करायचा पुणेकरांचा… महसूल वाढवून देण्यात आपला पण वाटा आहे की !

To be Continued…

पुणेकरांनी यंदा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक बिअर पिण्याचा विक्रम केलाय. यंदाच्या उन्हाळ्यात पुणे जिल्ह्यात बिअरच्या विक्रमी विक्रीची नोंद झालीय. अर्थात, याचं सारं श्रेय जातं ते पुण्यातील तळीरामांच्या ‘कामगिरी’ला बरं का ! गतवर्षी बिअरच्या विक्रीपोटी 1434 कोटी रुपये एवढा महसूल मिळाला होता. यंदा त्यात तब्बल 213 कोटींनी वाढ झाल्यानं 1647 कोटी रुपये एवढा महसूल जमा झालाय. तिकडं फेब्रुवारी महिन्यापासून सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आणि इकडं ‘थंड’ होण्यासाठी पुणेकरांनी बिअर रिचवायला सुरुवात केली. अर्थात, सगळेच पुणेकर काही बिअर घेत नव्हते बरं का ! लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचं पन्हं, लस्सी आदी शीतपेये पिऊन बहुतांश पुणेकर स्वतःला ‘थंड’ करून घेत होतेच की ! पण ज्याअर्थी यंदा बिअरच्या विक्रीपोटी महसुलात 213 कोटींनी वाढ झालीय त्याअर्थी बहुसंख्य पुणेकरांनी बिअर मारलीय, हे काही वेगळं सांगायला नको !
…………………….

यंदाच्या उन्हाळ्यात बिअरच्या विक्रीत 30 लाख लिटरनं वाढ

पुणे जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात बिअरच्या विक्रीत तब्बल 30 लाख लिटरनं वाढ झालीय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मद्यसेवनाचं प्रमाण इतकं वाढलं की, 2021-22 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं गेल्या तीन आर्थिक वर्षांहून सर्वाधिक महसूल मिळवला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार बिअर, देशी दारू आणि वाईनची विक्री गेल्या आर्थिक वर्षात महामारीच्या काळात पहिल्यांदाच वाढली होती. 2020-21 आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2021-22 मध्ये बिअरच्या विक्रीत अंदाजे 14 टक्के वाढ झालीय.
……………….

सचिन : अरे, पशा चहा काय मारत बसलायस ? पार्टी तो बनती है यार !

प्रशांत : च्यायला खरंच की ! चल, एक थंडगार बियर मारू…’
(ये भावा, कटिंगचे पैसे उद्या देतो रे ! सुटे नाहीत…)
…………………

दरवर्षी ऑगस्टचा पहिला शुक्रवार हा आंतरराष्ट्रीय बिअर दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा पहिला शुक्रवार 5 ऑगस्टला येतोय. त्यामुळं आता ‘त्या’ दिवशी पुणेकर किती बिअर रिचवतायत, हे पाहायचं… चिअर्स !!

 

 

 

 

 

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!