परभणी : परिस्थिती आपल्याला कधी काय करायला भाग पाडेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना 4भावांच्या बाबतीत घडली. यामध्ये या 4 भावांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र लहानपणीच हरपले. मात्र या चौघांनी जगण्याचा संघर्ष करत एक मोठे यश मिळवले आहे. तर ही कहाणी आहे सिसोदे कुटुंबातील तिन्ही भावंडांची….
परभणीमधील गंगाखेड तालुक्यातील माखणी गावातील (Makhani village) या तिन्ही भावंडांची नुकतीच पोलीस दलात निवड झाली आहे. या तिन्ही भावांच्या संघर्षमयी प्रवासात त्यांना त्यांच्या थोरल्या भावाने मोठे पाठबळ दिले. यामुळे या तिघांना हे यश मिळवणे सोप्पे झाले. कृष्णा, ओंकार, आकार या सिसोदे बंधूंच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र वयाच्या आठव्या वर्षीच हरपले. त्यानंतर दुसरीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी खानापूर फाटा येथील आश्रमशाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, ही शाळा बंद झाली.
यानंतर त्यांना परभणीतील जिजाऊ ज्ञानतीर्थ या शैक्षणिक संस्थेत मोफत शिक्षणाची संधी मिळाली. त्या ठिकाणी त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील महिला आणि बालविकास विभागाच्या वसतिगृहात काम करत आपले शिक्षण सुरु ठेवले. यानंतर या भावांनी पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले. या तिन्ही भावांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले. आणि त्यांची पोलीस दलात निवड झाली. यामध्ये त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना मोठे पाठबळ दिले म्हणून हे तिघेजण यश मिळवू शकले. मोठा भाऊ आकाश सिसोदे आजही माखणी गावात सालगडी म्हणून काम करत आहे. त्याच्या कष्टाचे अखेर चीज झाले. या तरुणांचा प्रवास अख्ख्या महाराष्ट्रासाठी प्रेरणा देणारा आहे.