अजित पवार (AJIT PAWAR) यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या अजित पवारांच्या (AJIT PAWAR) अचानक जाण्याने, येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः यंदाचा अर्थसंकल्प नेमका कोण सादर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अधिवेशनाच्या तयारीला वेग आला असतानाच, सध्याच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) हेच यंदाचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्रीपदाची जबाबदारी तात्पुरती तरी कोणाकडे दिली जाणार, याबाबत उत्सुकता होती. आता मुख्यमंत्री फडणवीस स्वतः ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील, असे संकेत मिळत आहेत.
राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असून, यामध्ये आगामी आर्थिक धोरणे, विकासकामे आणि योजनांवर सविस्तर चर्चा होणार आहे.