विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज- दीपक केसरकर

208 0

पुणे: महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळ येथे आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.देवेंदर सिंह, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला दिशा देण्यासाठी त्यामध्ये काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून तणावमुक्त शिक्षण दिले पाहिजे.

पायाभूत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे त्यासाठी कृतीयुक्त शिक्षण द्यावे. व्यवसायाभिमुख, कौशल्याधिष्ठित, तांत्रिक शिक्षण देण्यावर भर द्यावा. शैक्षणिक प्रक्रीयेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षण विभागाने सतत प्रयत्नशील रहावे. शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत बदल करावे, नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण द्यावे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर द्यावा, असेही केसरकर म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!