MIT BHARAT ASMITA PURSKAR: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू), पुणेतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर

47 0

पुणे, दि. ३१ जानेवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे २२ वे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहिर करण्यात आले आहेत. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्काराद्वारे विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींच्या कार्याची माहिती तरुण पिढीला व्हावी व या पिढीने त्या मार्गावर चालण्याची जिद्द बाळगावी हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
या वर्षी हा पुरस्कार बंगळूर येथील आयआयएमच्या प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, तरुण खासदार ज्योथिमणी सेन्नमलाई, सुप्रसिद्ध अभिनेता आणि मानसोपचार तज्ज्ञ पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार व सरोजवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी एमआयटीडब्ल्यूपीयूचे चिफ बिलिफ ऑफिसर डॉ. दत्ता दंडगे उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.३० वा. कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा.कराड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी अडीच लाख रूपये रोख, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

जागतिक दर्जाचे संशोधन व समाजावर शाश्वत प्रभाव निर्मिती आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आणि आंत्रप्रेन्यूअरशीपसाठी विशेष कार्य केल्याबद्दल प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. धडाडीच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या तामिळनाडू येथील तरुण खासदार ज्योथिमणी सेन्नीमलाई, यांना ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरविण्यात येईल. चित्रपट आणि वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या अद्वितिय कार्याबद्दल पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि सरोद या वाद्यासह भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पसरविल्याबद्दल पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्काराने’ गौरविण्यात येणार आहे.
आपल्या आचार, विचार, कृतीने व सेवेने ज्यांनी देशाच्या नाव लौकिकात भर टाकली. विविध मार्गाने आपली अमूल्य सेवा देशाला समर्पित केली अशा व्यक्तींच्या गौरवासाठी या पुरस्काराची योजना आहे.

‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२६’
पुरस्कारार्थीचा संक्षिप्त परिचय

१: ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार ’२०२६
प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर येथे उद्योजकतेच्या प्राध्यापक असून संस्थेचे स्टार्टअप इनक्यूबेटर च्या त्या अध्यक्षा आहेत. एक विद्वान, शिक्षिका आणि संस्थात्मक लिडर आहेत. स्टार्टअप्सच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे इनक्यूबेटर त्यांच्या नियंत्रणात उघडण्यात आले आहेत. त्यांनी नवउद्योजक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षी कल्पनांना वाव देण्यासाठी व ते मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रोत्साहन देत आहेत. डॉ. झा अनेक स्टार्टअप्सशी प्रत्यक्षात काम करतात व त्यांना मार्गदर्शन, सल्ला व धोरणामध्ये योगदान देतात. समृध्द उद्योग, नव निर्मिती आणि समाजावर प्रगतीशील आणि शाश्वत प्रभाव निर्माण करण्याचे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
२: ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार’ २०२६
खासदार ज्योतिमणी सिन्नीमलाई ः तमिळनाडूच्या करूर क्षेत्रातील तरूण खासदार असून त्यांनी एमपी लोकल एरिया डेव्हलपमेंट योजनेद्वारे मोठ्या प्रमाणात खर्चात अर्थसहय्यिता करून रोजगार आणि कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली. महिला व युवा सबलीकरणासाठी कार्य करतात. तसेच स्त्री-पुरूष समानता आणि कृषी क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यास अधिक भर देतात.
३: ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ २०२६
१: पद्मश्री डॉ. मोहन आगाशेः मानसोपचारात एमबीबीएस आणि एमडी पदवी संपादन केली आहे.  त्यानंतर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ (चखचक) सारख्या मानसिक आरोग्य संस्थांची स्थापना केली आहे. १९८० च्या दशकात विजय तेंडुलकरांच्या ’घाशीराम कोतवाल’ या प्रख्यात नाटकातील मॅकियाव्हेलियन नाना फडणवीसांच्या भूमिकेतून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर १९९० व १९९६ मध्ये ’संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ मिळाला. सत्यजित रे, श्याम बेनेगल, मीरा नायर, गौतम घोष आणि जब्बार पटेल या प्रख्यात डायरेक्टर्सच्या नेतृत्वाखालील नाटके व पुरस्कार विजेते चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचविला. ते एक कुशल अभिनेता, सर्जनशील आणि बौद्धिक क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.
२: पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खानः हे जागतिक कीर्तीचे शास्त्रीय संगीतकार आहेत. अमजद अली खान जेव्हा ६ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी सरोदचे पहिले गायन केले होते. सरोदला अधिक अर्थपूर्ण आणि बहुमुखी बनवण्यासाठी त्यांनी वाजविण्याच्या तंत्रात सुधारणा केली. तसेच त्याचे आधुनिकीकरण करण्याचे श्रेय ही त्यांना जाते. उस्ताद अमजद अली खान हे त्यांच्या इखारा तान (स्पष्ट आणि वेगवान जटिल वाक्ये) आणि बोटांच्या टोकांऐवजी नखांनी सरोद वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रख्यात ब्रिटीश डेली पब्लिकेशनने खान यांचा उल्लेख हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील शेवटच्या दिग्गजांपैकी एक केला आहे.

Share This News
error: Content is protected !!