सातारा : साताऱ्यातील (Satara Crime) माण तालुक्यातील मोगराळेजवळ शीतल ढाब्याजवळ इंडिका कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मुत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडला. ऋषिकेश जगदाळे (वय 28) असे तरुणाचे नाव आहे. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने मोगराळे गावावर शोककळा पसरली आहे.
काय घडले नेमके?
दीपावलीनिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी संघाबरोबर ऋषिकेश जगदाळे आणि त्याचा मित्र विक्रम सावंत हे मोटारसायकलवरून क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते क्रिकेट खेळून घरी परतत असताना मोगराळेजवळ असणाऱ्या पाचवड फाट्याजवळ शीतल ढाब्यासमोर मोटारसायकलला (एमएच 11 सीपी 7511) भरधाव कारने (एमएच 12 जीबी 8095) भीषण धडक दिली. कारचालक ओमकार सुभाष गुंजवटे (रा. गोंदवले बुद्रुक) फलटणहून येत होते. यावेळी मोगराळेजवळ असणाऱ्या पाचवड फाट्याजवळ शीतल ढाब्यासमोर आले असता हा भीषण अपघात घडला.
या अपघातात मोटारसायकलवरील ऋषिकेश जगदाळे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र विक्रम सावंत (रा. मोगराळे) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी विक्रम याच्यावर बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ऋषिकेशचा सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या नात्यातील मुलीशी विवाह झाला होता. दीपावलीच्या दिवशी घटना घडल्याने शांत स्वभाव असलेल्या ऋषिकेशच्या निधनाने मोगराळे गावावर शोकळला पसरली आहे. रात्री शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.