Beed:

‘मी कोण आहे तुला माहित नाही…’, असे म्हणत मुजोर कार चालकाची पोलिसांनाच मारहाण

529 0

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या गुन्हेगारीच्या विळख्यात आता पोलीसही अडकलेत की काय असे चित्र निर्माण झाले आहे. कारण पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका वाहतूक पोलिसाला आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर हिट अँड रन च्या घटनेत एका पोलीस कॉन्स्टेबलला आपला जीव गमवावा लागला. तर दुसऱ्या अपघातात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातच आता एका मुजोर कार चालकाने थेट पोलिसांनाच मारहाण करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच आता असुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं ?
प्राथमिक माहितीनुसार, हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी- शिवनगर रस्तावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान रविवारी या ठिकाणी पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड आणि आर. सी. फडतरे हे ड्युटीवर होते. दुपारी तीन-चार च्या सुमारास एक कार भरधाव वेगाने येत असल्याने ऋषिकेश गायकवाड यांनी कार बाजूला घेऊन थांबण्यास सांगितले. मंगेश शिवाजी फडके नावाचा तरुण या कारचा चालक होता. त्याने कारमधून बाहेर येत पोलिसांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. कार बाजूला न घेता रस्त्यातच उभी करून पोलिसांची आरेरावी केली. ‘मी कोण आहे तुला माहित नाही. तू नोकरी कशी करतो तेच बघतो’, अशी धमकी देत थेट पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

हा प्रसंग पाहताच दुसरे पोलिस अंमलदार फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावून आले. तेव्हा त्यांच्याशी ही कारचालकाने वाद घातले आणि कार मध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी नावाचा दुसरा व्यक्ती बाहेर आला. आणि त्यानेही फडतरे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय गंभीर आहे. पोलीस आणि कायद्याचा धाक पुण्यातील काही लोकांना राहिलाच नसल्याचे या प्रकरणावरून लक्षात येते. गेल्या अनेक दिवसांपासून अशी प्रकरणे सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना आता संरक्षणाची गरज आहे, असा सूर सर्वसामान्य नागरिक आळवताना दिसत आहेत. दरम्यान याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्याविरोधात हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!