यवत पोलिस ठाण्यातील केडगाव चौकीत कार्यरत असलेले पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी पाच दिवसांपासून व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावनिक संदेश आणि एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केल्यामुळे आणि त्यानंतर बेपत्ता झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.. परंतु आता निखिल रणदिवे यांच्याबाबत एक नवी माहिती आता समोर आली..
पुणे ग्रामीण पोलिस दलाला हादरवणारी ही घटना काल क्लायमॅक्सला पोहोचली. पोलिस नाईक निखिल रणदिवे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावनिक मजकूर आणि एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला… त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला… आणि ते बेपत्ता झाले. निखिल रणदिवे यांनी स्टेटसमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप केले होते. गेल्या वर्षभरापासून वरिष्ठांचा सततचा मानसिक छळ, मनमानी आदेश, वारंवार दूरस्थ ठिकाणी ड्युटी, आजारी मुलीला वेळ न देता येणे आणि नुकत्याच झालेल्या शिक्रापूर बदलीतील रिलीव्हिंगमध्ये झालेला विलंब यामुळे प्रचंड तणावात असल्याचे त्यांनी स्टेटसवर लिहिले होते.या पोस्टनंतर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि ते बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यवत, शिक्रापूर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती.
निखिल रणदिवे काल मध्यरात्री सुखरुप घरी परतल्याची माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली. रणदिवे परतल्याने पोलिस दल व कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मानसिक तणाव आणि वरिष्ठांविरुद्धचे आरोप यावर आता पोलिस दलाकडून स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता आहे.पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याविरुद्ध यापूर्वीही काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या कारभाराबाबत ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. आता याबाबत काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.