डॉक्टरच बनले यमराज ! ससूनमधील बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी नेऊन टाकले; ससूनच्या आणखी एका कारनाम्याने खळबळ

340 0

 

एकेकाळी रुग्णांसाठी आधार मानले जाणारे ससून रुग्णालय गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकरणांमुळे चर्चेत येत आहे. मात्र आधी घडलेल्या प्रकरणांपेक्षाही गंभीर प्रकरण उघड झाले आहे. ससून मधील बेवारस रुग्णाला मध्यरात्री निर्जन स्थळी नेऊन टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी सापळा रचून हे प्रकरण उघडकीस आणले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात. रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. दीड वर्षांपूर्वी अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेले असता त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले, पण परत आणले नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. तेव्हाच बेवारस रुग्णांबरोबर ससून मध्ये काहीतरी गैरप्रकार होत असल्याचा संशय त्यांना आला.

तेव्हापासूनच हे प्रकरण शोधून काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते. सोमवारी देखील त्यांनी असाच सापळा रचला होता. रितेश गायकवाड हे आपली रिक्षा घेऊन ससून च्या बाहेर उभे होते. त्यावेळी रात्री दीड वाजता साधारण रिक्षावाला असल्याचे समजून एका डॉक्टरने त्यांना एका रुग्णाला सोडून यायचं आहे, येणार का ? अशी विचारणा केली. कुठं सोडायचं असं विचारल्यावर ‘इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, अशा ठिकाणी सोड’ असे सांगण्यात आले. ‘नेमकं कुठे सोडू ? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. त्यावर ‘तू नवीन आहेस. आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो’, असे डॉक्टर म्हणाले.

पुढच्या काही वेळातच नवीन बिल्डिंग मधून दोन्ही पाय नसलेला आणि विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण कर्मचाऱ्यांनी रिक्षात आणून ठेवला. त्या रुग्णाला घेऊन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याने विश्रांतवाडी येथील निर्जन स्थळी रिक्षा नेली. त्या ठिकाणी अंधारात एका मोठ्या वडाच्या झाडाखाली रुग्णाला टाकून दिले. आणि डॉक्टर कर्मचारी तिथून निघून गेले.

पुढच्या काही वेळातच रितेश गायकवाड यांनी दादासाहेब गायकवाड आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांना घेऊन दादासाहेब गायकवाड त्या ठिकाणी पोहोचले व या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित रुग्णाला पुन्हा सचून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले आहे. मात्र या प्रकरणामुळे ससून मध्ये घडणारे गैरप्रकार पुन्हा प्रकाश झोतात आले आहेत. याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!