सिंहगड रोडवरील तुकाई नगर येथे एका महिलेला आत्महत्या करण्यापासून वाचवत दोन पोलिसांनी धाडसी कामगिरी केली आहे.
महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कॅनॉलच्या पाण्यात उडी घेतली. पोलिसांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन महिलेचे प्राण वाचवले. ही कामगिरी सिंहगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शैलेश नेहरकर आणि पोलीस शिपाई लक्ष्मण विलास काशीद यांनी केली आहे. 27 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे अमलदार पोलीस शिपाई लक्ष्मण काशीद तसेच पोलीस नाईक शैलेश नेहरकर असे मिळून वडगाव मार्शल दिवस पाळी कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना एमडीटीवर 10 वाजून 58 मिनिटांनी कॉल आला की, तुकाई नगर येथील कॅनॉल मध्ये एक महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असून ताबडतोब पोलीस मदत हवी आहे. कॉल रिसीव करून काशीद आणि नेहरकर हे घटनास्थळी पोहचले.