संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकणारी एक घटना पुण्यात आज सकाळी उघडकीस आली. पुण्यातील खराडी परिसरात असलेल्या नदीपात्रामध्ये हात पाय आणि डोकं कापलेलं महिलेचं धड नदीपात्रात आढळून आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी भागात असलेल्या नदीपात्रात लाईट कन्स्ट्रक्शनचे काम करणाऱ्या कामगारांना आज सकाळी नदीमध्ये मृतदेह तरंगत असताना दिसला. त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांना संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळीत दाखल होऊन पंचनामा केला आणि हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा मृतदेह 50 ते 60 वयोगटातील महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या भागांमध्ये काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती घेऊन तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास चंदननगर पोलीस आणि पुणे पोलिसांची गुन्हे शाखा अशा दोन पथकांकडून सुरू आहे. सध्या तरी हा मृतदेह पाहता प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलेची हत्या दोन दिवसांपूर्वीच झाली असण्याची शक्यता आहे. कारण मृतदेह कुजण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्याचबरोबर सध्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे नदीला भरपूर पाणी आहे. त्यामुळे या महिलेची हत्या मृतदेह सापडलेल्याच परिसरात झाली की हा मृतदेह वरून वाहत वाहत खाली आला याचा तपास सुरू आहे.