बिश्नोई गॅंगच्या रडारवर असलेला अभिनेता सलमान खान याला संपवण्यासाठी बिश्नोई गॅंगने सलमान खानच्या हत्येची 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक पोलीस तपासातून समोर आली.
काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराच्या बाल्कनीत गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. याचा तपास अनेक दिवसांपासून सुरू होता आणि आता यात तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आरोपींवर दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिसांनी म्हटलं आहे की, ‘बिश्नोई गॅंगने सलमान खानला मारण्याची जबाबदारी 18 वर्षांखालील मुलांना दिली होती. आरोपींनी सलमानला मारण्यासाठी प्लॅन आखलेला असून सर्व शूटर्स गोल्डी ब्रार आणि अनमोल बिश्नोईच्या ऑर्डरची वाट पाहत होते. वरून ऑर्डर मिळताच हे आरोपी पाकिस्तानमधून आणलेल्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करून सलमान खानवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. दरम्यान हे सर्व शूटर्स पुणे, रायगड, नवी मुंबई, ठाणे येथील असून ते गुजरातमध्ये लपून बसले आहेत’, असं तपासातून निष्पन्न झालं आहे.
शूटर्सकडून सलमानच्या घराची, फार्म हाऊसची रेकी
कुख्यात गुंड सुक्खाने सलमानच्या हत्येची सुपारी शूटर अजय कश्यप उर्फ एके आणि इतर चार जणांना दिली होती. त्यानुसार कश्यप आणि त्याच्या गॅंगने सलमानच्या फार्महाऊसची पाहणी केली. त्याच्या सुरक्षा बंदोबस्ताची, बुलेटप्रूफ वाहनांची माहिती घेतली. त्यामुळेच सलमानला मारण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र मागवण्यात आली. पाकिस्तानातील शस्त्र विक्रेता डोगरशी संपर्क करून त्यातून एक शस्त्रांची डील झाली. या डीलनुसार सुक्खाने 50 टक्के ॲडवान्स पेमेंट देऊन उर्वरित रक्कम हत्यारे भारतात डिलिव्हरी झाल्यावर देण्याचं मान्य केलं होतं.
दरम्यान, हे शूटर्स सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या किंवा बाहेर त्याचं काम सांभाळणाऱ्या इतर साथीदारांच्या एका इशाऱ्याची वाट पाहत होते, अशी मागणी पोलिसांच्या हाती आली आहे.