‘आपण इथले भाई आहोत, जो दिसेल त्याला..’; धनकवडीत टोळ्यांचा राडा, एकावर कोयत्याने हल्ला

177 0

“आपण इथले भाई आहोत, जो समोर येईल, त्याला सोडायचं नाही”, असे म्हणत पुण्यातील एका टोळीने दुसऱ्या एका तरुणावर कोयत्याने वार केला. ही घटना धनकवडी परिसरात घडली. धनकवडीतील पाटीलनगरमध्ये दोन टोळ्यांनी चांगलाच हैदोस घातलेला पाहायला मिळाला. हा प्रकार पाटीलनगरमध्ये शनिवारी रात्री आठ वाजता घडला.

या प्रकरणी रोहित राजेंद्र रोंगे (वय 25, रा. गोंविदराव पाटीलनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संकेत कसबे (वय 23, रा. वनराई कॉलनी), सोहम सोनार (वय 20), शंशांक मेमाणे, पियुष भरम (वय 23, रा. आंबेगाव पठार), युवराज धुळे (वय 18, रा. कात्रज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटकही केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोंगे हे पाटील नगर मध्ये असलेल्या आपल्या घराच्या पार्किंगमध्ये उभे होते. त्यावेळी या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. फिर्यादींच्या डोक्यात व दोन्ही हातांवर या टोळक्याने धारधार कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. प्रतिकार केला असता शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार पाहून फिर्यादींच्या आजी पुढे येऊन प्रतिकार करू लागल्या. यावर उलटा कोयता त्यांच्या हातावर मारून त्यांनाही जखमी करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता फिर्यादी गंभीर जखमी झालेले असतानाही “आपण इथले भाई आहोत, जो समोर येईल, त्याला सोडायचं नाही”, असं म्हणत परिसरात दहशत माजवली.

पुढे रोहितवरील हल्ल्याची माहिती त्याच्या मित्रांना मिळताच ते ही टोळी रहात असलेल्या गणेश चौकातील शेलार चाळ येथे गेले. ज्यांनी रोहितला मारहाण केली त्यांचा शोध घेतला. पण रोहितचे हल्लेकरी न सापडल्याने त्यांनी परिसरातील रिक्षाच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. याप्रकरणी सर्व आरोपींवर गुन्हे दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!