मुंबई- भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. कांबळी याने दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या गाडीला ठोकर दिली तसेच विनोदने त्याच्या इमारतीच्या गेटवर गाडी धडकावली. अटकेची कारवाई केल्यानंतर जामीनावर त्याची सुटका देखील करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
विनोद कांबळी दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यांच्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली होती. तक्रारदाराचं म्हणणं होतं की नशेत कांबळी यांनी आपल्या गाडीला टक्कर मारली आहे. यानंतर वांद्रा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दुसऱ्या एका वृत्तानुसार विनोद कांबळी वांद्रे येथे ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीच्या गेटवर त्याची गाडी आदळली. यावरून विनोदचा वॉचमन आणि तेथील रहिवाशांसोबत वाद झाला. हा किरकोळ वाद इतक्या टोकाला गेला की इमारतीमधील रहिवाशांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
त्याच्याविरुद्ध वेगाने गाडी चालवणे, लोकांचा जीव धोक्यात घालणे त्याच बरोबर इमारतीच्या संपत्तीला धोका पोहोचवणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. विनोदची गाडी जेव्हा इमारतीच्या गेटला आदळली होती तेव्हा त्याने मद्यपान केले होते असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
याआधी डिसेंबर २०२१ मध्ये विनोद कांबळी चर्चेत आला होता. मागच्यावर्षी विनोद कांबळीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. आपली सायबर फसवणूक झाल्याचा त्याने दावा केला होता. एएनआयच्या वृत्तानुसार, आरोपीने कांबळीची एक लाख रुपयांना फसवणूक केली होती. केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या नावाखाली आरोपीने कांबळीचे बँकेची माहिती मिळवली व त्याला फसवलं.