पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला. या मागे त्यांच्याच सख्या बहिणी आणि दाजींचा हात आहे. त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वादातून एका तरुण नगरसेवकाचा जीव गेला. कोमकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची नोंद अदखलपात्र अशी केली गेली. पोलिसांनी कठोर कारवाई न केल्याने संजीवनी आणि जयंत कोमकर यांची हिम्मत बळवली आणि ‘पोरांना बोलवून तुला ठोकतेच’ अशी धमकी देऊन संजीवनीने ती खरी करून दाखवली. हाच पोलीस ठाण्यातील एनसी पासून ते खुनापर्यंतचा वनराज आंदेकर हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम पाहूया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्ट मधून…
पुण्यातील कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आणि मुलगी संजीवनी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होते. संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांचं अक्षता-अंकिता जनरल स्टोअर्स या नावाचं दुकान आहे. या दुकानावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. ही कारवाई वनराज याच्या सांगण्यावरुन केली असल्याचा संशय बहिण संजिवनी व दाजी जयंत कोमकर यांना होता. त्यानंतर आकाश सुरेश परदेशी नावाच्या व्यक्तीशी कोमकर यांचे वाद झाले. 1 सप्टेंबरला कोमकर यांच्या याच दुकानावर दगडफेक झाली. त्याची तक्रार देण्यासाठी कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी आकाशला बोलवून घेतलं. त्यावेळी त्याच्याबरोबर वनराज आणि त्यांचा पुतण्या शिवम आंदेकर हे देखील पोलीस ठाण्यात गेले. आणि तिथेच वनराज आंदेकर हत्याकांडाची पाळमुळं रुजली गेली.
आकाश परदेशी याला पोलीस स्टेशनच्या आवारातच संजीवनी आणि जयंत कोमकर यांनी मारहाण केली. त्यावेळी वनराज बरोबर आलेला पुतण्या शिवमने ही भांडणं सोडवली. तेव्हा आकाशला वनराजने कोमकार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितलं. तेव्हा पोलिसांनी या तक्रारीची एनसी म्हणजेच अदखलपात्र अशी नोंद केली. आणि हीच एनसी वनराजच्या जीवावर बेतली.
वनराजच्या सांगण्यावरून आकाश परदेशीने तक्रार दाखल केली. त्यामुळे ‘वनराज आम्ही तुला जगु देणार नाही. तू आमच्यामध्ये आलास. तू आमचे दुकान पाडायला सांगून आमच्या पोटावर पाय देतोय काय, तुला आज पोर बोलावून ठोकतेच’, अशी धमकी पोलीस ठाण्यातच संजीवनीने दिली. आणि पुढच्या काही तासातच संजीवनीने तिची धमकी खरी करून दाखवली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इनामदार चौकात उभ्या असलेल्या वनराज आणि पुतण्या शिवम यांना 12-13 जणांच्या टोळक्याने घेतलं. पवन करताल नावाच्या गुंडाने शिवमवर गोळ्या झाडल्या परंतु तो खाली बसला आणि वाचला. मग पवन ने वनराज वर फायरिंग केलं. दुसऱ्या गाडीवरून आलेला समीर काळेने देखील वनराज वर गोळ्या झाडल्या. वनराजने नेम चुकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार संजीवनीच्या घरा समोरच घडला. त्यावेळी गच्चीत उभी राहून संजीवनी आणि जयंत यांनी ‘मारा मारा त्यांना सोडू नका, ठार मारा’, अशीच चिथावणी दिली. तेव्हा पवन करतालने कोयते काढले. शिवम आणि वनराज पळू लागले मात्र शिवम पळाला पण वनराज खाली पडला आणि तिथेच त्याचा घात झाला… खाली पडलेल्या वनराजला लगेचच पवन, समीर आणि इतरांनी घेरलं. चेहरा, डोकं, मान, छाती आणि हातावर सपासप वार केले. आणि वनराजचा मृत्यू झाला.
सख्ख्या बहिणीने दिलेली धमकी वनराजने गांभीर्याने घेतली नाही. आणि पोलिसांनी तर अदखलपात्र अशी नोंद केली. त्यामुळेच हिम्मत वाढलेल्या आणि बदला घेण्याच्या रागात संजीवनीने सकाळी दिलेली धमकी संध्याकाळी खरी करून दाखवली. हल्ला झाल्यानंतरही पुतण्या शिवम पळून जाण्यात यशस्वी ठरला मात्र पळता पळता खाली पडलेल्या वनराजचा घात झाला.