रविवारी पुण्यात कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला. या खुनाचा कट केवळ एका फोनवर रचण्यात आला. एक फोन, गुंडांची टोळी, सात-आठ हत्यारं आणि वनराज आंदेकर यांचा डी एंड… हा फोन नेमका कोणी केला, कोणाला केला आणि त्यानंतर हल्ल्यापर्यंतची सूत्र कशी फिरली, पाहूया या इनसाईड स्टोरीमधून…
संजीवनीने भाऊ वनराजला पोरं बोलवून ठोकण्याची धमकी दिली. त्यानंतर संजीवनीचा दिर प्रकाश कोमकर याने मोक्का कायद्या अंतर्गत शिक्षा झालेला आणि आता जामीनावर बाहेर आलेला गुंड सोमनाथ गायकवाड याला फोन केला आणि वनराजला संपवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली.
कसा शिजला हत्येचा कट?
सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने मागच्या वर्षी खून केला. त्याचा राग डोक्यात असलेल्या सोमनाथला वनराजचा काटा काढण्याची संधी समोरून चालून आली. त्यानंतर सोमनाथ ने एक फोन केला आणि एकाच फोनवर वनराजच्या हल्ल्याचा कट रचला गेला.
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात गुंड सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दुधभाते या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. वनराजला संपवण्याची जबाबदारी सोमनाथवर होती. ज्याची तयारी अनिकेतने केली.
प्रकाशचा फोन येताच सोमनाथने अनिकेत दूधभातेला फोन केला. पिस्तूल कुठे आहे आणि व्यवस्थित आहे का असे विचारणा केली. त्यावर अनिकेतने हो असं उत्तर दिलं. त्यावर सोमनाथने अनिकेतला याआधी पिस्तूल चालवलंय का ? असं विचारल्यावर अनिकेत नाही म्हणाला. मग सोमनाथने अनिकेतला पिस्तुलांबरोबर हत्यार देखील जवळ ठेवा, आपल्याला एकाचा गेम वाजवायचाय, असं बोलून फोन ठेवला. लगेचच अनिकेत ने इतर आरोपींना फोन करून माहिती दिली. दुसऱ्या दिवशी ज्या चौकात हल्ला झाला त्या उदयकांत आंदेकर चौकाची रेकी केली. वनराज किती वाजता, कुठे जातो, याची माहिती जमवली. हत्येच्या दिवशी सर्व आरोपी मार्केट यार्ड परिसरात एकत्र जमले. वनराज आंदेकर चौकात आल्याची माहिती त्यांना मिळतात नाना पेठेच्या दिशेने निघाले. आंदेकर चौकात पोहोचले आणि वनराजला संपवलं.
वनराजवर हल्ला करायला आलेल्या आरोपींकडे अंदाजे तीन पिस्तूल होत्या. त्यातील एकाचं पिस्तूल लॉक झाल्याने चाललंच नाही. तर दोन पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्या वनराजला लागल्याच नाहीत. त्यामुळे उरलेल्या इतर आरोपींनी कोयत्याने वार करायला सुरुवात केली. आणि याच कोयत्याच्या वारामुळे वनराजचा जीव गेला. सोमनाथ गायकवाडने एका फोन कॉलवर वनराजला संपवण्याचा कट रचला आणि त्यात तो यशस्वी ही झाला.
VANRAJ ANDEKAR MURDER:
एका फोनवर आरोपी जमले, हत्यारं जमवली अन् वनराजचा केला “गेम”
गुंड सोमनाथ गायकवाडने कसा रचला कट