माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. बुधवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली असून अटके नंतर आता या प्रकरणात अटकेत असलेल्या एकूण आरोपींची संख्या ही 18 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान बुधवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींचा या कटात सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
आधीच्या आरोपींप्रमाणे या आरोपींना देखील सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाची संपूर्ण माहिती होती. कटर असणाऱ्या मुख्य आरोपींनी हत्या करण्यासाठीची शस्त्रे त्यांच्याकडे लपवून ठेवली होती. फरार आरोपी शुभम लोणकर यांनीच या दोघांना शस्त्र पुरवून ती लपवून ठेवण्यास सांगितल्याचं तपासात उघड झालं आहे. तर या आरोपींकडून सुमारे 40 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून आता आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे.
पुण्यातून शूटरला अटक
सिद्दिकी हत्याकांड प्रकरणात पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये त्यानेही शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. गौरव विलास आपुणे (वय-23, रा. कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गौरवला सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाची संपूर्ण माहिती होती. त्याचबरोबर या प्रकरणातील फरार आरोपी शिवकुमार गौतम आणि हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट करणारा शुभम लोणकर यांनी त्याला शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण दिल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.