दोन मूकबधिर मुलं, हातात बॅग, बॅगेत मित्राचा मृतदेह… असे धक्कादायक दृश्य मुंबईतील सर्वात गजबजलेल्या दादर स्थानकावर सोमवारी पाहायला मिळाले. दादर स्टेशनच्या फलाट क्रमांक अकरावर दोघेजण एक जड बॅग घेऊन तुतारी एक्स्प्रेमध्ये चढण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली आणि एक धक्कादायक गुन्हा उघडकीस आला.
नेमकं प्रकरण काय?
दादर स्थानकावर दोन मूकबधिर मुले तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्याकडे एक बॅग देखील होती जी बॅग ट्रेनमध्ये चढवणं दोघांना जमत नव्हते. दुरून पाहता की बॅग प्रचंड जड असल्याचे लक्षात येत होते. त्यावरूनच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि माधव केंद्रे यांना दोघांवर संशय आला व त्यांनी या दोघांना बॅग उघडून दाखवण्यास सांगितले. ही बॅग उघडताच पोलिसांना जबर धक्का बसला. कारण या बॅगेत कपडे, किंवा काही साहित्य नसून चक्क एका तरुणाचा मृतदेह होता. आपलं बिंग उघड होण्याच्या भीतीने दोघांपैकी एक जण पसार झाला. तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्शद अली सादिक शेख असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. तर बॅग घेऊन स्थानकावर आलेल्यांपैकी एकाचे नाव शिवजीत सिंह तर दुसऱ्याचे जय चावडा असे आहे. आरोपी आणि मयत हे एकमेकांचे मित्र होते. ते मुंबईत वास्तव्यास होते. दोन्ही आरोपींनी मयत अर्शद याला रविवारी आरोपी जय चावडा याच्या घरी बोलावले. तिघांनीही एकत्र बसून मद्यप्राशन केले. त्यानंतर त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाले. याच वादाच्या रागातून जय चावडा आणि शिवजीत सिंग यांनी अर्शद अलीची हत्या केली. व त्याचा मृतदेह बॅगेत भरून कोकणात घेऊन जाण्यासाठी निघाले. मात्र त्याच वेळी पोलिसांसमोर त्यांचे पितळ उघडे पडले.
या आरोपींची चौकशी सुरू असून त्यांनी वाद झाल्यामुळे हत्या केल्याचे सांगितले आहे. मात्र दुबईत बसलेल्या कोणीतरी अर्शदच्या हत्येची सुपारी दिली होती. त्याच्याच सांगण्यावरूनच या दोघांनी ठरवून अर्शदचा खून केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळेच खुनाचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.