पुणेकरांना धडकी भरवणारी एक बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावरील 11 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. एक्स वरून एका नामांकित विमान सेवा देणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला 11 विमानांना उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्याहून वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या 11 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी पोस्टमध्ये देण्यात आली आहे. विमान सेवा देणाऱ्या एका नामांकित कंपनीच्या मॅनेजरला एक ई-मेल आणि एक्स पोस्ट आली असून, संबंधित आरोपीने पुण्याहून देशातील आणि परदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार आहेत, अशी धमकी दिली.
या धमकीमुळे पुणे एअरपोर्ट परिसरात एकच खळबळ उडाली. विमानतळ प्रशासनाने बॉम्बची शोधाशोध देखील केली मात्र काहीच न सापडल्याने भयभीत झालेल्या विमानतळ प्रशासनाने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या नऊ दिवसात विविध ठिकाणच्या 170 हुन जास्त विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.