पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चोरांसाठी मौक्याचे ठिकाण झाले आहे. आता यात चोरांनी चक्क विद्यापीठातील चंदनाची पाच झाडे चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये चंदनाची झाडे लावण्यात आली आहे. त्यापैकी पाच झाडे या चोरांनी चोरून नेली आहेत. यासंदर्भात जगन्नाथ शंकर खरमाटे (वय-५८, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर खरमाटे हे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात नोकरीला आहेत. वनस्पतीशास्त्र विभागात झाडांच्या अनेक प्रजाती असलेले एक उद्यान आहे. या उद्यानात चंदनाची दोन झाडे लावण्यात आली होती. तर काही अंतरावर असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याशेजारी देखील चंदनाची तीन झाडे होती. ती सर्व झाडे चोरट्यांनी कापून नेण्याचा प्रयत्न केला आहे. या चोरांनी १८ जून रोजी वनस्पतीशास्त्र विभागातील दोन चंदनाची झाडे चोरून नेण्याचा प्रयत्न केला तर २६ जून रोजी शाहू महाराजांच्या पुतळ्याशेजारी असलेली चंदनाची ३ झाडे कापून नेण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच ही घटना खरमाटे यांच्या लक्षात आली. व त्यांनी तात्काळ चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र ही झाडे कापण्याचा प्रयत्न होत होता तेव्हा कोणाच्याच लक्षात कसे आले नाही ? या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नाही? हे प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत.
चंदन चोरीच्या घटना वाढल्या
चंदनाला आयुर्वेदात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे भारतात चंदनाची झाडे कमी असून मौल्यवान आहेत. त्यामुळेच चंदन तस्करी पूर्वापार चालत आली आहे. मात्र पुणे शहरातही अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. या चंदन तस्करांना रोखण्यासाठी कठोर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.