पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारख्या अनेक घटना समोर येत असतात. यादरम्यानच मुंबई पोलिसांचा एक संताप जनक “प्रताप” समोर आला आहे. झडती घेण्यासाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने निरपराध व्यक्तीला आरोपी बनवण्यासाठी त्याच्या खिशात ड्रग्स ठेवले. मात्र ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांचा हा खोटा चेहरा समोर आला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मुंबईतील खार परिसरात 30 ऑगस्ट रोजीही धक्कादायक घटना घडली. गोठ्यात काम करणाऱ्या डॅनियल नावाच्या तरुणाला अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतले. डॅनियलच्या खिशात 20 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्स सापडल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र आपण निरपराध असल्याचे डॅनियलने सांगितले. त्यामुळेच पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही तपासले. ज्या सीसीटीव्हीमध्ये पोलिसांचा हा प्रताप उघडकीस आला.
सीसीटीव्हीत काय दिसलं ?
सीसीटीव्ही फुटेज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर या फुटेजमध्ये दोन पोलीस उभे असल्याचे दिसत आहे. हे पोलीस गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीची झडती घेतात. झडतीच्या बहाण्याने एका पोलिसाने चक्क ड्रग्स चे पाकीट डॅनियलच्या खिशात टाकले. व त्याच्याकडे ड्रग्स सापडल्याचा आरोप करत त्याला ताब्यात घेतले.
हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर तात्काळ डॅनियलला सोडून देण्यात आले. तर संबंधित चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. ड्रग्सच्या प्रकरणात बनावट आरोपी हजर करण्यासाठी पोलिसांनी हा प्रताप केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्वच स्तरातून टीका होत आहे.