मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या पुण्यातील आमदारांच्या मामाचं अपहरण… बारा तासांच्या आत झाला खून… 40 किलोमीटर लांबच्या परिसरात आढळला मृतदेह… कायदा आणि सुव्यवस्थेची लख्तरं वेशीवर टांगणारी ही घटना घडली पुणे जिल्ह्यात… आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा खून झाला. त्यांचे मारेकरी कोण ? खूनामागे कारणं काय ? आणि पोलीस तपासातून आतापर्यंत काय काय हाती आलं ? पाहूया यावरची ही इनसाईड स्टोरी…
मयत सतीश वाघ कोण होते हे जाणून घेऊया… 58 वर्षीय सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते. ते आपल्या कुटुंबासह हडपसरच्या मांजरी परिसरात वास्तव्यास होते. ते स्वभावाने अतिशय शांत आणि सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणारे होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेत जमीन असल्याने त्यांना शेतीची आवड होती. त्यांच्या मालकीचं एक हॉटेल देखील याच परिसरात आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार त्यांचं कोणाशीही थेट वैर नव्हतं. मात्र तरीदेखील सोमवारी त्यांचं अपहरण करून थेट खून करण्यात आला.
सतीश वाघ यांचा अपहरण ते खून.. हा संपूर्ण घटनाक्रम केवळ बारा तासांच्या आत घडला.
फुरसुंगी फाटा परिसरात असलेल्या ब्लूबेरी हॉटेलच्या समोरून सकाळी साडेसहाच्या सुमारास सतीश वाघ यांचं अपहरण झालं. ही घटना त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने पाहिली. सातच्या सुमारास वाघ यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. साडेसात वाजता हडपसर पोलिसांना कळविण्यात आलं. साडेआठ वाजता गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. साडेनऊ वाजता पोलिसांची 12 पथक प्रत्यक्ष तपासासाठी रवाना झाली. बारा वाजल्यापासून सीसीटीव्ही आणि फोनच्या लोकेशन वरून तपास सुरू केला गेला. तीन वाजता पुण्याचा आयुक्तांनी स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण तपासाचा आढावा घेतला. आणि तपास सुरू असतानाच साडेपाच ते सहाच्या दरम्यान शिंदवणे घाटात वाघ यांचा मृतदेह सापडला.
शिंदवणे घाटाच्या परिसरात काही मुलं फिरत असताना त्यांना हा बेवारस मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आठ वाजता घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड पोहोचले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला. व पोलिसांच्या पथकांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला.
सतीश वाघ यांचं अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी कोणताही फोन केला नाही. याचाच अर्थ अपहरण हे खंडणीसाठी करण्यात आलं नव्हतं. त्याचबरोबर अपहरण झाल्याच्या काही वेळातच त्यांचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच अर्थ अपहरण हे थेट खून करण्यासाठीच करण्यात आलं होतं. त्यामुळे वाघ यांच्या खुनामागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पूर्ववैमनस्यातून किंवा आर्थिक वादातून खून झाला आहे का या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा पुणे पोलीस आणि राज्य सरकार करतंय तरी काय हा प्रश्न उपस्थित होत आहेत.
YOGESH TILEKAR: आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेल्या मामाचा खून