राज्यात हत्यांचं सत्र थांबता थांबत नसल्याचं दिसून येत आहे. नुकतीच पनवेलमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली. पोटच्या लेकीनेच आपल्या जन्मदात्या आईच्या हत्येची सुपारी देऊन आईला संपवल्याची माहिती समोर आली आहे. प्रणिता नाईक असं आरोपी मुलीचं नाव असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.
प्रणिता हिने आपली आई प्रिया नाईक यांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. आई बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरण्यास रोखत असल्यामुळे चिडलेल्या प्रणिताने हे धक्कादायक पाऊल उचललं.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणिता ही विवाहित असून तिचे पतीसोबत पटत नसल्याने ती दोन वर्षांपासून माहेरी राहत होती. मात्र या दरम्यान ती वारंवार बाहेर फिरत असायची ज्यामुळे आईने तिच्या बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर निर्बंध घातले. त्याचाच राग प्रणिताला आला आणि आईच्या या निर्बंधातून सुटका मिळवण्यासाठी थेट आईला संपवण्याचा कट रचला. तिने तिचा मानलेला भाऊ विवेक पाटील याला आईची हत्या करण्यासाठी दहा लाख रुपयांची सुपारी दिली. विवेकने त्याचा मित्र निशांत पांडेला मदतीला घेतले. आणि प्रिया यांचे गळा दाबून हत्या केली.
हत्येनंतर प्रणिताने आपल्या आईची हत्या झाल्याचा बनाव केला. तिच्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी अज्ञात इस्मान विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र तपासातून प्रणिताचे तिच्या आईशी खटके उडत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवून प्रणिताची कसून चौकशी केली. आणि पोलिसी खाक्या दाखवताच प्रणिताने गुन्ह्याची कबुली दिली.
पनवेल पोलिसांनी आरोपी प्रणितासह हत्या करणारा विवेक पाटील आणि निशांत पांडे या दोघांना आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.