मॅनेजरने कामगारांसमोर केला अपमान आणि तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून केली आत्महत्या
बदलती जीवनशैली आणि सततच्या कामाच्या तणावामुळे तरुण पिढी दबावात असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशाच तणावामुळे पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल प्रमोद साळवी (वय ३०, रा, बोपोडी) हे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल हा येरवड्यातील कॉमर झोन परिसरात असलेल्या एका खासगी कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी याच कंपनीचा मॅनेजर असलेल्या झीशान हैदर याने विशाल बरोबर वाद घातले होते. कंपनीतील इतर कामगारांसमोर त्याचा अपमान करून कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील दिली होती. काहीच दिवसांपूर्वी विशालला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे तो प्रचंड तणावात आणि नैराश्यात होता. याच तणावात त्याने २१ जून २०२४ ला बोपोडीतील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास करत असताना आत्महत्येपूर्वी विशालने त्याच्या सोशल मीडियावर यासंदर्भातली चिट्ठी आणि झीशान हैदरचे छायाचित्र पोस्ट केले होते, या प्रकरणी विशालची बहीण प्रीती यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर प्राथमिक तपासानंतर झिशान याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.