एका सरकारी कार्यालयाच्या आवारातील जमीन खचल्याने पूर्ण ट्रक जमिनीखाली गेल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. घटना पुण्यातील समाधान चौक परिसरात असलेल्या सिटी पोस्ट ऑफिस मध्ये घडली. आणि जमिनीखाली गेलेला हा ट्रक पुणे महानगरपालिकेचा मैलापाणी वाहून नेणारा ट्रक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा ट्रक सिटी पोस्ट च्या आवारामध्ये आला. चालक हळूहळू ट्रक पुढे नेत असताना अचानक ट्रकच्या मागच्या चाकांच्या खालची जमीन खचली. आणि ट्रक मागच्या बाजूने जमिनीच्या खालच्या खड्ड्यात कोसळू लागला. बघता बघता पूर्ण ट्रक जमिनीच्या खाली गेला. सुदैवाने चालक लवकर बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र इतकं मोठं भगदाड अचानक पडल्याने या संपूर्ण इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या खड्ड्याच्या खाली भूमिगत मेट्रोचं काम सुरू आहे. ये मेट्रोच्या कामामुळेच तर हा खड्डा पडला नाही ना ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर हा खड्डा किती मोठा आहे ? याचा आजूबाजूच्या इमारतींवर किती मोठा परिणाम होऊ शकतो हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान हा ट्रक बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली असून क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढला जाणार आहे.