घरातली लाडाची लेक, एलएलबीचं शिक्षण घेणारी हुशार विद्यार्थिनी.. कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली अन् घरी परतलीच नाही. अडीच – तीन दिवसांच्या अथक शोधकार्यानंतर सापडला तो तिचा मृतदेह… ही घटना घडली आहे पुण्यातील सांगवी (sangavi missing girl case) परिसरात राहणाऱ्या मानसी गोविंदपुरकर (mansi govindpurkar)या 21 वर्षीय तरुणीसोबत
नेमकं काय घडलं ?
मानसी गोविंदपुरकर ही 21 वर्षीय तरुणी लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती मंगळवारी पुण्यातील सांगवी परिसरातील घरातून कॉलेजसाठी बाहेर पडली. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिच्या बेपत्ता असण्याची पोलिस तक्रार देण्यात आली. आणि पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिस तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. मानसी ही घराबाहेर पडल्यानंतर कॉलेजला न जाता तिने टॅक्सी बुक केली. टॅक्सीतून ती थेट 70 – 75 किलोमीटर लांब असलेल्या लोहगडावर गेली. लोहगडाच्या पायथ्याच्या तिकीट काउंटरजवळील कॅमेऱ्यात ती गडावर एकटीच प्रवेश करताना दिसली होती. त्यानंतर तिच्या हालचाली कॅमेऱ्यात फारशा दिसल्या नाहीत. मात्र पोलिस शोधकार्य करत असताना मानसीचं शेवटच मोबाईल लोकेशन हे लोहगड किल्ल्याच आढळून आलं. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता मानसीचा मृतदेह रिवर्स वाटरफॉलच्या कड्याच्या खाली आढळून आला. त्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सहाय्याने तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान मानसीने आत्महत्या केली, तिचा घातपात झाला की अपघात झाला असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर मानसीने नैराश्यातून उडी मारुन जीवन संपवल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय.
मानसीचा अपघात, घातपात की आत्महत्या ?
मानसी बरोबर नेमकं काय घडलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मानसी एकटीच लोहगडावर का गेली ? याविषयी तिने कुणाशी चर्चा केली होती का ? कड्यावरून पाय घसरल्याने ती खाली कोसळली की तिला खरंच कोणत्या गोष्टीचं नैराश्य होतं आणि त्यातून तिने आत्महत्या केली, याचा शोध सुरू आहे. तिचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणीकडेही चौकशी केली जात आहे. मात्र मानसीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.