विशेष संपादकीय! Walmik Karad चा 57 वा वाढदिवस! ‘तो’ मात्र बिन भाड्याच्या खोलीत!

967 0

‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!’ हे संतवचन सर्वश्रुत आहे. या अभंगातील ‘गुंडा’ या शब्दाचा अर्थ पराक्रमी आणि कर्तबगार असा आहे पण काही स्वयंघोषित ‘आकां’नी ‘गुंडा’ या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला, तर काहींनी हा शब्दशः अर्थ प्रत्यक्ष जगला. सध्या माध्यमं आणि सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत असणारं त्यापैकीच एक नाव म्हणजे वाल्मीक कराड! 29 जानेवारी 1969… वाल्मीक कराडचा 57 वा वाढदिवस! पण तो त्याच्या वाढदिवशी कुठं आहे तर कोठडीत… बिन भाड्याच्या खोलीत!

केक खाण्याऐवजी खातोय कोठडीची हवा!

आतापर्यंत समर्थकांच्या गराड्यात, शुभेच्छांच्या वर्षावात आणि मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करणारा हा वाल्मीक कराड त्याच्या 57 व्या वाढदिवशी केक खाण्याऐवजी कोठडीतली हवा खातोय. किती तरी जणांच्या मुंडक्यावर पाय ठेवून तोऱ्यात वावरत आलेला हा वाल्मीक कराड आज 10 × 10 च्या खोलीत चकरा मारत बसलाय. त्याला ‘हॅपी बर्थ डे’ म्हणायला त्याच्या जवळचंही कुणी त्याच्या जवळ उरलं नाही. अनेकांचे जीव घेऊन त्यांचं श्राद्ध घालण्यास भाग पाडणारा हा वाल्मीक कराड आज त्याच्या कर्माची फळं भोगतोय. जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत सर्वांना मनासारखं वागण्याची सूट मिळते पण जेव्हा तो पापाचा घडा भरतो तेव्हा त्याचा ‘शिशुपाल’ होतो, हे इतिहास सांगतो.

वाल्मीक कराडचा ‘बर्थ डे’ कोण कोण मिस्ड करत असेल?

वाल्मीक कराडचे चेलेचपाटे, समर्थक, हाजी हाजी करत त्याच्या मागं-पुढं करणारे त्याचे कार्यकर्ते आज त्याचा ‘बर्थ डे’ मिस करत असतील. कारण त्यांना त्यांच्या ‘वाल्मीक अण्णा’ समोर तलवारीनं केक कापता येत नाही, हवेत बार काढता येत नाही की पार्टी करता येत नाही. तरी देखील त्याचे समर्थक ‘वाल्मीक अण्णा म्हणजे देवमाणूस’ असं म्हणून फ्लेक्सबाजी करतील, कट आऊट्स लावतील, सोशल मीडियावर ‘हॅपी बर्थ डे वाल्मीक अण्णा’ म्हणून पोस्ट करतील. वाल्मीक कराडच्या निकटवर्तीय राजकारण्यांची तर मोठी पंचाईत झाली असेल. कारण त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट प्रोग्राम असो किंवा त्यांचे वाढदिवस; हा वाल्मीक कराडच सर्व काही मॅनेज करायचा पण आज त्याच्या निकटवर्तीय राजकारण्यांना त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देता येत नसतील. खूप वाईट असेल ना त्यांना…

गुणांचा नव्हे गुन्ह्यांचा पुतळा!

कुणाचाही वाढदिवस असला की, त्यादिवशी आपण त्या व्यक्तीनं केलेलं समाजकार्य आणि त्याच्या गुणांचे गोडवे गातो, त्याच्या गुणांचं भरभरून कौतुक करतो, पण हा ‘वाल्या’ तर कुप्रसिद्ध! त्याच्या अशा कोणत्या गुणांचं कौतुक करायचं? कारण तो तर अवगुणांनी बरबटलेला! त्याच्याकडं गुण आहेतच कुठं पण त्याच्या नावावर गुन्हे मात्र नक्की आहेत. त्यामुळं त्याच्या वाढदिवसानिमित्त गुण नाही पण निदान त्याच्या गुन्ह्यांचा
पाढा तरी वाचूयात…

परळीत 10 गुन्हे; अन्य ठिकाणच्या गुन्ह्यांची यादी वेगळीच!

वाल्मीक कराडवर परळीसह बर्दा, अंबाजोगाई, केज आदी विविध ठिकाणच्या पोलिस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.
खून, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे, अपहरण करणे, शिवीगाळ-दमदाटी करणे, अतिक्रमण करणे, बेकायदा जमाव जमवणे, सार्वजनिक मालमत्ता आदी आर्थिक नुकसान करणे, शेतमालाचं नुकसान करणे, बंधक बनवणे, दुखापत करणे आदी भली मोठी गुन्ह्यांची यादीच त्याच्या नावावर आहे.

पांगरी ते परळी आणि परळी ते कोठडी!

वाल्मीक कराडचा पांगरी ते परळी आणि परळी ते कोठडी असा प्रवास कसा झाला आणि वाल्मीक कराड ‘वाल्मीक अण्णा’ कसा बनला हेही जाणून घ्यायला हवं. कारण अशा ‘थोर विभूती’चा प्रेरणादायी जीवनप्रवास आपण आपल्या नजरेखालून घातला नाही तर आपण आयुष्यात येऊन काय केलं? बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गेल्या काही वर्षांत ‘धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे,’ असं जणू समीकरणच बनलं. वाल्मिक कराडच्या कारकीर्दीची सुरूवात मात्र गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करताना झाली. परळी वैजनाथ शहरापासून 10 किलोमीटरवर असणाऱ्या पांगरी गावात 29 जानेवारी 1969 रोजी वाल्मिक कराडचा जन्म झाला. हेच पांगरी गाव गोपीनाथगड म्हणूनही ओळखलं जातं. प्राथमिक शिक्षण पांगरी आणि गाढे पिंपळगाव या गावांमध्ये घेतलं आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी वाल्मिक कराड परळीला आला.

सोडली पांगरी, गाठली परळी, बनला ‘घरगडी’!

गोपीनाथ मुंडे परळीच्या परमार कॉलनीत भाड्याच्या घरात राहात होते. परळीत आल्यानंतर वाल्मीक कराड हा गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आला आणि त्यांचा घरगडी बनून त्यांच्या घरातील सगळी कामं करू लागला. 1988-89 मध्ये परळीच्या शिवाजी चौकात वाल्मिक कराडनं भगवानबाबा गणेश मंडळ स्थापन केलं आणि मंडळाच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा, सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करायला सुरूवात केली. याच काळात त्याला परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामांची कंत्राटं मिळू लागली. या विद्युत प्रकल्पात येणारा कोळसा जवळच्या रेल्वे स्थानकावरून आणावा लागायचा. त्यामुळं या कोळसा वाहतुकीची कंत्राटं घ्यायला त्यानं सुरूवात केली. याच औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा अवैध व्यापार सुरू झाला आणि या राखेच्या धंद्यात त्यानं आपला जरब बसवला.

जवाहर शिक्षण संस्थेच्या सभेत हाणामारी आणि मांडीत गोळी!

1993 -1995 दरम्यान जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक वाल्मीक कराडच्या आयुष्यातली ‘टर्निंग पॉईंट’ ठरली. या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध टी. पी. मुंडे यांच्या पॅनलचा आमनासामना झाला. निवडणूक निकालात गोपीनाथ मुंडे यांचे 7 तर टी. पी, मुंडेंचे 23 उमेदवार विजयी झाले. त्यामुळं अध्यक्षपदाच्या निवडीवरून सर्वसाधारण सभेत तुंबळ हाणामारी सुरू झाली आणि ती रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या पिस्तूलातून निघालेली गोळी गोपीनाथ मुंडेंच्या बाजूनं असणाऱ्या वाल्मिक कराडच्या मांडीत घुसली. या घटनेनंतर वाल्मिक कराडवर गोपीनाथ मुंडेंचा विश्वास बसला आणि तो मुंडे कुटुंबीयाच्या आणखी जवळ गेला. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करण्यास सुरूवात केलेल्या वाल्मिक कराडनं हळूहळू स्वतःचा जम बसवला. दरम्यानच्या काळात त्याची गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडितअण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक वाढली.

आधी नगरसेवक, मग उपाध्यक्ष, नंतर नगराध्यक्षाचा प्रभार!

पुढं 2001 साली परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विरोध असतानाही पंडितअण्णा मुंडे यांनी वाल्मिक कराडला तिकीट दिलं. त्यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला. त्यानंतर वाल्मिक कराड नगर परिषदेचा उपाध्यक्ष झाला. त्यानंतर काहीकाळ परळीचा प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही काम केलं. एकीकडं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक वाढत गेली, तर दुसरीकडं धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध दुरावत गेले. धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना वाल्मिक कराड त्यांच्या स्वीय सहायका प्रमाणं काम करायचा.
शाळेत असताना वाल्मिक कराड परळीतून व्हीसीआर भाड्यानं आणून नाथरा, इंजेगाव आदी गावांच्या जत्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवायचा. यात्रेत सिनेमा दाखवणारा हा वाल्मिक कराड पुढं जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड आणि काही खासगी कंपन्यांचा संचालक झाला. या दोन्ही कंपन्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत. सुरूवातीला परळी मतदारसंघात काम करणाऱ्या वाल्मिक कराडनं धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर आपली जिल्हाभर ओळख निर्माण केली.
तत्कालीन नगराध्यक्ष सोमनाथ हालगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून तो परळीचा प्रभारी नगराध्यक्ष देखील राहिला. वाल्मिक कराड यानं जिल्हा नियोजन समितीचा विशेष सदस्य, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तालुकाध्यक्ष, परळी नगरपालिकेचा गटनेता अशी पदंही भूषवली.

इव्हेंट मॅनेजरचा रोल’!

गोपीनाथ मुंडे यांच्या सभांचं नियोजन वाल्मिक कराड याच्याकडं असायचं. एखाद्या इव्हेंट मॅनेजरला लाजवेल, असं नियोजन तो करायचा. अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बीड जिल्ह्यातील ‘संदेश यात्रेची’ धुरा धनंजय मुंडेंकडे होती. तेव्हा त्याचं नियोजन वाल्मिक कराडनंच केलं होतं. एवढंच काय, तर धनंजय मुंडे भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा वाल्मीक कराडनंच स्थापन केली होती. गोपीनाथ मुंडेंचा घरगडी म्हणून सुरू झालेला वाल्मीक कराडचा प्रवास आता राज्यभर चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणापर्यंत येऊन पोचलाय.

देवाकडं प्रार्थना आणि संतोष देशमुख कुटुंबीयाना न्याय

आणि आता शेवटी… चांगलं कार्य करत असलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असतो. त्याच्या हातून आणखी समाजकार्य घडो, ही ईश्वरचरणी प्रार्थना देखील करत असतो पण इथं या वाल्मीक कराडला काय शुभेच्छा द्यायच्या? परमेश्वराकडं त्याच्या विषयी काय प्रार्थना करायची हाच प्रश्न पडतो. शुभेच्छा तर देता येत नाहीत पण देवाकडं प्रार्थना मात्र नक्की करू शकतो… ‘या
वाल्मीक कराडचं पुढील आयुष्य असंच बिन भाड्याच्या खोलीत जावो, त्याच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये त्याला कठोरात कठोर शिक्षा होवो आणि तो लवकरात लवकर फासावर लटकल्याचं संपूर्ण महाराष्ट्र पाहो, तर आणि तरच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल!’

एकूणच काय, तर खून, खुनाचा प्रयत्न, धमकी, खंडणी, अपहरण अशी कुकर्म करून पापाचा डोंगर रचलेल्या आणि वाल्मीकचा ‘वाल्या’ बनलेल्या या नराधमाला ‘हॅपी बर्थ डे’ तरी कुठल्या तोंडानं म्हणावं?

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, Top News मराठी

संपादकीय! आजचा ‘सुविचार’ : ‘वाल्मीक कराड माणूस नाही तर विचार’! बीडमध्ये वकिलांच्या ‘वाल्मीक’ ओव्या; पांगरीत घुमल्या बाया!

Our WhatsApp for all the latest and most reliable news Join the group.

https://whatsapp.com/channel/0029Vb2Z6498F2pHMwM9YA1S

Share This News
error: Content is protected !!