पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना स्वतः गुंड भावाच्या बहिणी देखील ‘भाईगिरी’ करत असल्याची घटना समोर आली आहे. गुंड असलेला भाऊ तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या दोन बहिणी चक्क हप्ता वसूल करू लागल्या व हप्ते न देणाऱ्यांना जीवे मारण्याचे धमकी देत मारहाण देखील केली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड मधील भोसरी परिसरामध्ये घडली.
याबाबत रेश्मा सिकंदर शेख (वय २९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी पोलिसात फिर्याद नोंद केली आहे. तर उज्वला अमोल गायकवाड (रा. चिखली) आणि रसिका गोविंद जगताप (रा. भोसरी) यांच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मासळी बाजारात मच्छीचे दुकान आहे. तीन महिनाभरापूर्वी उज्वला व रसिका तेथे आल्या. यापूर्वी आमचा भाऊ कुक्या याला हप्ते देत होता. तो आता जेलमध्ये गेला आहे. तर आता आम्हा दोघींना हप्त्याचे पैसे द्यावे लागतील. अशी थेट धमकी या दोघींनी फिर्यादींना दिली. त्यावर फिर्यादींनी पैसे द्यायला नकार दिल्यानंतर, पैसे दिले नाही तर तुम्हाला धंदा करु देणार नाही, अशी ताकीद देत फिर्यादी व इतर महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 700 रुपये हप्ता देण्याची मागणी केली. त्यानंतरही फिर्यादींनी पैसे दिले नाहीत त्यामुळे या दोघी गेले पंधरा-वीस दिवस फिर्यादींना शिवीगाळ करत धमक्या देत होत्या. मात्र आठ ऑगस्टला पुन्हा या दोघी सायंकाळच्या सुमारास फिर्यादींच्या दुकानावर गेल्या. त्यांच्याकडे दोन महिन्यांच्या हप्त्याच्या पैशांची मागणी केली, त्यांनी नकार दिल्यानंतर ‘तुला जास्त माज आला आहे का’ असं म्हणत फिर्यादींना मारहाण केली.
याचवेळी रागात उज्वला हिने ‘आम्ही दोघी तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. तर दुसरी बहीण असलेल्या रसिकाने थेट हातातील कोयता फिर्यादीच्या मानेवर मारला. मात्र फिर्यादींनी हा कोयता चुकवला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर या दोघी धमकी देऊन तिथून निघून गेल्या. या बहिणी गेल्या तीन महिन्यांपासून फिर्यादींना मानसिक आणि शारीरिक त्रास देतात. त्यालाच कंटाळून फिर्यादी महिलांनी चक्क टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी त्यांच्या दुकानातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतर दुकानदारांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचवेळी पोलीस तपासातून हा सगळा प्रकार उघडकीस आला.