सासरच्यांनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय ३२) असे मृत जावयाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत उर्फ सागर याचा नूतन गावडे हिच्याशी विवाह झाला होता. वसंत हा कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असायचे. याच वादातून वसंत याची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या घरच्यांनी केला आहे. वसंत याला पत्नी नूतन हिने सोमवारी रात्री आडेली सातेरी गाळू येथे राहत्या घराजवळ बोलावले. वसंत घरी पोहोचायच्या आधीच सासरच्या मंडळींनी त्यांच्या घराच्या कंपाऊंड भोवती विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले. याच तारांचा शॉक वसंतला लागला. व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी त्याचा मृतदेह त्याच परिसरातील एका नर्सरीत आढळून आल्याची धक्कदायक बाब उघड झाली.
याप्रकरणी मयत वसंत याच्या भावाने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे मयत वसंत याची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेंगुर्ला पोलिसांकडून सुरू आहे.