चेष्टा मस्करीत परवानाधारक बंदुकीतून गोळी चालवल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकासह त्यांच्या चुलत भावाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. विनोद नढे असं या नगरसेवकाचे नाव असून त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे याने बंदुकीतून एक राऊंड फायर केला होता. या प्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक विनोद नढे यांना एका काकांनी फोन करून एका रेस्टॉरंटमध्ये बोलावून घेतलं होतं. तेव्हा ‘नुकतीच एका माजी नगरसेवकाची हत्या झाली. तू काळजी घेत जा’ असं काकांनी नढे यांना सांगितलं. त्यावर कमरेला लावलेल्या परवानाधारक पिस्तुलाला हात लावून ‘मी आता बंदूक घेऊन फिरतो’, असं नढे म्हणाले. त्यानंतर हीच बंदूक त्यांचा चुलत भाऊ सचिन याने पाहायला घेतली आणि चेष्टा मस्करीत प्लेट ठेवण्याच्या पत्र्याच्या टेबलवर गोळी झाडली. यामध्ये कोणीही जखमी झालं नाही मात्र खूप मोठा आवाज झाला. ज्यामुळे इतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मोठा आवाज झाल्याने हॉटेलच्या मॅनेजरने जाऊन पाहिले असता त्यांना सचिन यांच्या हातात पिस्तूल दिसलं. त्यामुळेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण निर्माण होण्यासारखे कृत्य केल्यामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या सचिनला तर निष्काळशीपणा केल्यामुळे विनोद नढे त्यांना अटकही करण्यात आली आहे. अशी माहिती वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, निवृत्ती कोल्हटकर यांनी माहिती दिली.