पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना दररोज समोर येत आहेत. त्यातच आता पुण्याच्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये स्वच्छता कर्मचारी असलेल्या महिलेवर तिथल्याच सुपरवायझरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी आरोपी सुपरवायझरला अटक केली आहे.
सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्या विरोधात 29 वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार 29 जून रोजी बाणेर परिसरात असलेल्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या इमारतीमध्येच घडला. पीडित महिला आपले काम संपून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली येत होती. त्यावेळी आरोपी सोमनाथ याने रेडिएशन विभागात धूळ असून स्वच्छता करण्याची गरज आहे, त्यामुळे तात्काळ तिथली स्वच्छता करण्याच्या सूचना या महिलेला दिल्या. सुपरवायझरचे ऐकून ही महिला स्वच्छता करण्यासाठी रेडिएशन विभागात गेली. त्यानंतर काही वेळात आरोपी सोमनाथ हा तिथे आला. बेसावध असलेल्या महिलेला त्याने चेंजिंग रूम मध्ये ढकलत नेले. तिथे कामावरून काढून टाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पीडित महिला प्रचंड घाबरलेली होती. ती रडू लागली. तेव्हाही कामावरून काढून टाकण्याची धमकी देत या प्रकरणाची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी या आरोपीने दिली. त्यानंतर या घाबरलेल्या महिलेने सुरक्षा व्यवस्थापकाकडे तक्रार केली. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी अखेर या महिलेने पोलीस ठाणं गाठलं. आणि आता या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.