धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता वाल्मीक कराडच्या गुंडगिरीतून महाराष्ट्र सावरलेला नसताना त्यांच्याच विरोधात आवाज उठवणाऱ्या सुरेश धस यांचा वाल्मीक कराड समोर आला. त्याचं नाव सतीश उर्फ खोक्या भोसले… याच भोसलेने (satish aka khokya bhosale) दोघांना बेदम मारहाण केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. त्यातच आता याच निर्दयी भोसलेने शेकडो प्राण्यांचे बळी घेतल्याचं समोर आलंय.
सतीश उर्फ खोक्या भोसले हा आष्टीतील गुंड प्रवृत्तीचा तरुण आहे. तो भाजपच्या भटक्या विमुक्त सेलचा पदाधिकारी असून आमदार सुरेश धस यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता आहे. तो पारधी समाजातील असून अगदी साध्या घरात राहतो. मात्र त्याचे सोशल मीडियाचे अकाउंट पाहिल्यास हातात आणि गळ्यात किलोभर सोनं घालून फिरतो. बेफामपणे पैशांचे बंडलच्या बंडल हवेत उडवतो. त्याच्या याच शौकांमुळे तो आष्टी मध्ये गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात त्याने हा पैसा कुठून कमावला ? त्याचा नेमका इन्कम सोर्स काय ? याविषयी कोणालाही माहिती नाही. मात्र भोसले हा संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांपेक्षा फार काही वेगळा आहे असंही नाही. कारण हाडामासाच्या माणसांवर जराही दया न दाखवता त्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या याच भोसलेने शेकडो मुक्या जनावरांचा जीव घेतलाय. हरीण, काळवीट, मोर आणि ससे मारण्याचा तर रेकॉर्डच त्याने केला आहे. त्याने आणि त्याच्या गॅंग ने मिळून आतापर्यंत शंभरहून अधिक हरणं आणि काळवीट संपवले असून जवळपास 200 हून अधिक ससे त्यांनी मारले आहेत. तर आतापर्यंत अनेकदा राष्ट्रीय पक्षी असलेले मोरही मारले आहेत. आष्टी, शिरूर, पाटोदा आणि इतर परिसरातील गायरान जमिनीमध्ये जाळं लावून भोसले आणि त्याची गॅंग या प्राण्या पक्षांना पकडते. त्यानंतर गलोरीच्या साह्याने त्यांना मारलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून हे निर्दयी नराधम मुक्या जनावरांचे जीव घेत आहेत. ज्या जनावरांना वन्यजीव कायद्याअंतर्गत विशेष संरक्षण आहे, मुख्यतः तशाच शेकडो जनावरांचे बळी या गॅंगने घेतले आहेत. या जनावरांना निर्दयीपणे मारून त्यांचं मांस खाण्याचे शौक या मानवरुपी जनावरांना आहेत. अर्थात जनावरांची हत्या केवळ मांस खाण्यासाठी केले जात होती की यामागे आणखी काही कारण आहेत ? हत्या केलेल्या प्राण्यांची तस्करी व्हायची का ? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र इतक्या मोठ्या संख्येने प्राणी मारले जात असताना याविषयी वनविभागाला अद्याप कुठलीच कल्पना कशी काय नाही? किंवा कल्पना असूनही जाणून-बुजून दुर्लक्ष केलं जात आहे का ? भोसले आणि त्याच्या गॅंगवर अजून कुठलीही कारवाई का झाली नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
वनविभागाला जाग येणार ?
सतीश भोसलेच्या या कारनाम्यांबाबत बीडच्या गाव खेड्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होते. याचाच अर्थ स्थानिकांना याविषयी माहिती आहे. मग असं असूनही वनविभागाला याविषयी काहीच माहिती कशी काय नाही ? की माहिती असूनही जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे ? हे प्रश्न निर्माण होत असताना मुक्या जनावरांसाठी कर्दनकाळ बनलेल्या या खोक्याच्या डोक्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे ? कोणत्या नेत्याच्या आशीर्वादाने तो हे सगळं करतोय आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल होत नाही ? याचा शोध लावणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान हे प्रकरण आता समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता तरी वनविभागाला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे भोसले हा दोन दिवसांपासून फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.