जालना येथून बेपत्ता झालेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे शिरवळमध्ये बेशुद्धावस्थेत सापडले

912 0

जालना- तब्बल 13 दिवसांपूर्वी जालना येथून बेपत्ता झालेले जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे शिरवळ येथे सापडले आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. संग्राम हे 13 दिवसानंतर बेशुद्धावस्थेत सापडले.

याबाबतची माहिती अशी की, जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे ( रा . यशवंत नगर , जालना मूळ रा. मारुल, ता . कराड, जि. सातारा ) हे 2 फेब्रुवारी रोजी ते जालना येथील घरातून बाहेर पडले. बराचवेळ झाल्यानंतर ते घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली. पती सापडत नसल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. एसीबीमधील पोलीस अधिकारी गायब झाल्याने महाराष्ट्र पोलीस दल हादरुन गेले. पोलिसांनी यासंदर्भात सर्व माहिती घेऊन ताटे यांचा शोध सुरु केला. मात्र ताटे यांचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. दरम्यान ताटे बेपत्ता असल्याची नोंद जालना पोलीस ठाण्यात झाली.

चार दिवसांपूर्वी ते सांगली शहरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला. मात्र ते पोलिसांना सापडले नाहीत. रविवारी ( दि.13 ) दुपारी सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एकजण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे परिसरातील एका व्यक्तीला दिसले. त्या व्यक्तीला संग्राम ताटे यांच्या हातावर मोबाईल नंबर लिहिल्याचे दिसून आले. या क्रमांकावर त्या व्यक्तीने फोन केल्यावर संग्राम यांच्या पत्नीने तो फोन उचलला. संग्राम यांचे वर्णन सांगताच त्यांनी ओळखले. यानंतर त्यांच्या पत्नीने तातडीने याची माहिती कराड येथील कुटुंबियांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!