Sagar Bhingardive Bail Parade : अहिल्यानगरमधील सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या आरोपीची जामिनावर सुटताच भव्य मिरवणूक काढण्यात आली. सागर भिंगारदिवे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याची खांद्यावर उचलून घेत आणि चार चाकी मधून मिरवणूक काढली. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. संपूर्ण राज्यभरात गाजलेलं रेखा जरे हत्याकांड आहे तरी काय ? आणि यातील आरोपीची मिरवणूक (Sagar Bhingardive Bail Parade) काढल्याचा प्रकार नेमका काय ? पाहूया
85 Year Old Man Marriage Scam : पुण्यात 85 व्या वर्षी पत्नी शोधणाऱ्या वृद्धाला लाखोंचा गंडा
अहिल्यानगरचं रेखा जरे हत्याकांड हे संपूर्ण राज्यभरात गाजलं होतं. संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. रेखा जरे या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकारी होत्या. त्यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी अहिल्या नगरच्या पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. प्रथमदर्शी ही हत्या रेखा जरे आणि रस्त्यावरील दुचाकीस्वार यांच्यात झालेल्या वादातून झाल्याचं वाटत होतं. त्या अनुषंगाने तपासही करण्यात आला मात्र तपासातून वेगळच सत्य समोर आलं. तपासात हे सुपारी देऊन, कट रचून केलेलं हत्याकांड असल्याचं उघड झालं. या प्रकरणात सागर भिंगारदिवे हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळासाहेब बोठे असल्याचं मानलं जातं. त्यामुळेच या हत्याकांडाची राज्यभरात चर्चा झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सागर भिंगारदिवे याला अटक झाल्यानंतर प्रथम नाशिक तुरुंगात ठेवलं होतं. नंतर त्याला अहिल्यानगरच्या सबजेलमध्ये हलवण्यात आलं. मात्र काही दिवसांपूर्वी भिंगारदिवे याने आपली पत्नी गंभीर आजारी असून तिच्यावर उपचार करण्यासाठी कोणीही नाही, असं कारण देत जामिनासाठी अर्ज केला. सरकार पक्षाने जामिनाला विरोध करत सुनावणी दरम्यान भिंगारदिवे याच्यावरील गंभीर आरोपांचा उल्लेख केला. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने शनिवारी भिंगारदिवे याला तात्पुरता जामीन मंजूर केला. त्याच्या समर्थक आणि मित्रमंडळींनी तुरुंगा बाहेर गर्दी केली. उत्साहाच्या भरात त्याला खांद्यावर उचलून घेत आलिशान कारमधून मिरवणूक काढली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर “सिंग इज बॅक” म्हणत व्हायरल करण्यात आला. त्यामुळेच आता भिंगारदिवे सह मिरवणूक काढणारे (Sagar Bhingardive Bail Parade) ही अडचणीत आले.
TOP NEWS MARATHI : वारीत चोऱ्या करणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत; अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख LIVE
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपीचं असं थाटामाटात स्वागत करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. जरे यांच्या समर्थकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कृत्याचा निषेध करत न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या व्हिडिओची सत्यता तपासली जाईल. व्हिडिओत तथ्य आढळल्यास दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण करण्याचे प्रकार समाजात वाढल्याचं दिसून येत आहे.