तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू; मृतदेह नदीत टाकताना तिची मुलं रडू लागल्याने दोन मुलांनाही दिलं ढकलून
पुण्यात माणुसकीला काळीमा लावणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील मावळ मधील एका महिलेचा गर्भपाता दरम्यान मृत्यू झाला त्यानंतर तिचा मृतदेह नदीत टाकण्यात येत होता त्यावेळी तिची मुले रडू लागल्याने त्यांना देखील नदीत ढकलून देण्यात आले आहेत. पुण्यातील या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मिसिंगच्या या केस मध्ये चौकशी आणि तपास सुरू असताना या महिलेला दोन मुले असून ही महिला गरोदर होती अशी माहिती मिळाली. त्याचबरोबर या महिलेला तिच्या प्रियकराने गर्भपात करण्यासाठी दोन्ही मुलांसह आपल्या एका मित्राबरोबर ठाण्यात पाठवले होते. गर्भपात करतेवेळी या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रियकराच्या मित्राने या महिलेचा मृतदेह व तिची दोन्ही मुले घेऊन तळेगाव गाठले. 9 जुलै 2024 रोजी पहाटे प्रियकराचा मित्र पुण्यात दाखल झाला. प्रियकराने मित्राच्या मदतीने महिलेचा मृतदेह नदीमध्ये टाकून दिला. हा गुन्हा घडत असताना या महिलेची दोन्ही मुले तिथेच होती. हे पाहून ती मुले रडू लागली. त्यामुळे रागाच्या भरात प्रियकराने महिलेच्या दोन्ही मुलांना जिवंतपणे नदीमध्ये ढकलून दिले.
ही धक्कादायक घटना 6 ते 9 जुलै 2024 दरम्यान घडली आहे. ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तपासा दरम्यान हे तिहेरी हत्याकांड उघड झाले. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा साथीदार रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.