पुणे शहरात आज सकाळपासून एकच खळबळ उडाली होती. पुण्यात काही बांगलादेशी घुसखोर शिरल्याची बातमी आणि संशयीतांचे फोटो काल समाज माध्यमांवर व्हायरल झाले. त्यानंतर पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक अलर्ट मोडवर आले होते. हे संशयित काल पुण्यातील मंगळवार पेठेत असलेल्या कमला नेहरू रुग्णालयात आल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने काल रात्री पोलिसांनी रुग्णालयाची पडताळणी केली. तेव्हा त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र आज हे संशयित पुन्हा रुग्णालयात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत असून चौकशी केली. या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
कुठून, का, कशासाठी आले ?
या तिघांपैकी एकाचे नाव रिझवान अली असल्याचे सांगण्यात आले. हे तीन संशयित आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कमला नेहरू रुग्णालयात आले. हे तिघेही पुण्यातील लोहिया नगर भागामध्ये राहत असून रिझवानची पत्नी कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेत असल्याने तिला पाहण्यासाठी आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले होते. रुग्णालयातर्फे सर्व कर्मचाऱ्यांचा फोनवर संशयतांचे फोटो आधीच पाठवले असल्याने रुग्णालयातील बाउन्सर्सनी त्यांना ओळखले. रुग्णालयातील प्रशासनाने त्यांना बोलण्यात गुंतवून एका रूम मध्ये बंद करून ठेवले. पुढील काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ या तिघांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले.
चौकशीत या संशयीतांकडे बिहारचा पत्ता असलेले आधार कार्ड सापडले. बिहारहून पुण्यामध्ये ते मदरसा आणि मस्जिद साठी वर्गणी गोळा करण्यासाठी आल्याचे या तिघांनी सांगितले. काल या संशयीतांनी कमला नेहरू रुग्णालयात केस पेपर काढून डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते. आज आणखी काही रक्ताच्या तपासण्या करण्यास सांगितल्यामुळे ते पुन्हा रुग्णालयात गेले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ते बांगलादेशी असल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. रिझवान ची पत्नी खरंच कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेत आहे का याची चौकशी अद्याप सुरू आहे. हे तिघेजण कोणता घातपात करण्याच्या विचाराने पुण्यात आले होते ? की सोशल मीडियावर खोटा मेसेज व्हायरल झाल्याने या तिघांना संशयित मानले जात आहे, याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.