पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन प्रमाणपत्र सादर करुन फसवणुक करण्याचा प्रयत्न केलेल्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे.
सचिन भिमराव वाघमोडे (रा. लक्ष्मीटाकळी, सोलापूर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३४७/२३) दिली आहे. हा प्रकार ग्रामीण पोलीस दलाच्या अधीक्षक कार्यालयात ८ मे २०२३ पासून आजपर्यंत घडला.
वाघमोडे भरती प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई) प्रमाणपत्र सादर केले होते. भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू असताना वाघमोडेने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय पोलिसांना आला.