पुणे : इंदापूर तालुक्यातील (Pune News) हगारेवाडी येथे मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात दोघी मृतावस्थेत आढळल्या आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अश्विनी सागर म्हस्के (वय 28)वर्ष व सानवी सागर म्हस्के (वय 4) वर्षी अशी मृतांची नावे आहेत.आज शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास या दोघींचे मृतदेह राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे आढळून आले. शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह खाली उतरवले. मात्र, ही आत्महत्या आहे कि हत्या याचा तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.
या प्रकरणी वालचंदनगर पोलीसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या त्याच्यावर संशय असून त्याला ताब्यात घेऊन जात असताना संतप्त नातेवाईकांना सागर म्हस्के याला चांगलाच चोप दिला. यानंतर पोलिसांनी कशीबशी त्याची जमावाकडून सुटका करुन त्याला पोलीस ठाण्यात नेले. माय-लेकीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने हगारेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या हत्येप्रकरणी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांकडून घेण्यात आला आहे.